Home » महाराष्ट्र » मुंबईत सुमारे ९७ टक्के खाटा रिक्त; केवळ पाच रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर

मुंबईत सुमारे ९७ टक्के खाटा रिक्त; केवळ पाच रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर

मुंबईत-सुमारे-९७-टक्के-खाटा-रिक्त;-केवळ-पाच-रुग्ण-कृत्रिम-श्वसनयंत्रणेवर

मुंबईमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास दोन हजारांवर गेली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास दोन हजारांवर गेली आहे. त्यामुळे चौथी लाट येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असून शहरातील रुग्णालयात सुमारे ९७ टक्के खाटा रिक्त आहेत.

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून दैनंदिन रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. सहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होऊन ती नऊशेवरून आता १ हजार ९०० च्यावर गेली आहे. बाधितांचे प्रमाण सुमारे १४ टक्क्यांवर आहे. सध्या या साथीचा संसर्ग वेगाने होत असला तरी दैनंदिन रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अजूनही १०० च्या आत राहिले आहे. सध्या शहरात सुमारे ११ हजार १५९ खाटा उपलब्ध असून ३८९ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातील सुमारे तीन टक्केच खाटांवर रुग्ण आहेत. बहुतांश नवीन रुग्ण लक्षणेविरहित किंवा त्यांना सौम्य लक्षणे आहेत. रुग्णालयात दाखल करण्याची गरज अत्यंत कमी रुग्णांना भासत असल्याचे आढळते.

कृत्रिम श्वसनयंत्रणेवर केवळ पाच रुग्ण

शहरातील रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांपैकी सुमारे ७९ टक्के रुग्ण हे पालिकेच्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. रुग्णालयांतील ३२३ रुग्ण सर्वसाधारण, तर ६६ रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये आहेत. ३४ रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे. गंभीर प्रकृती आणि कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असलेल्या रुग्णांची संख्या केवळ पाच आहे.

मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प

करोनाचा प्रसार वाढत असला तरी मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. जूनच्या दहा दिवसांत मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास तिप्पटीने वाढ झाली असली तरी चार मृत्यूंची नोंद झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.