Home » महाराष्ट्र » Exclusive:आर्यन खान अटकेत असताना शाहरूख संजय सिंह यांना भेटल्यानंतर काय घडलं?

Exclusive:आर्यन खान अटकेत असताना शाहरूख संजय सिंह यांना भेटल्यानंतर काय घडलं?

exclusive:आर्यन-खान-अटकेत-असताना-शाहरूख-संजय-सिंह-यांना-भेटल्यानंतर-काय-घडलं?

Exclusive: What happened after Shah Rukh met Sanjay Singh while Aryan Khan was in custody?फोटो-फेसबुक

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीनचीट मिळाली.. मात्र या प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यामुळे त्यावेळी देशभरात खळबळ उडाली होती.. अटक ते क्लीनचीट हा सर्व घटनाक्रम आपल्या सगळ्यांसमोर आहे. मात्र इंडिया टुडे मँगझिनच्या हाती आर्यन खान प्रकरणातील मोठी घडामोड लागली आहे.

एसआयटीचे प्रमुख संजय सिंह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एक्सक्लुझिव माहितीनुसार आर्यन खान ज्यावेळी जेलमध्ये होता तेव्हा त्याने संजय सिंह यांची चौकशीदरम्यान भेट घेतली होती तसंच शाहरूख खानही संजय सिंह यांना भेटला होता. आणि या भेटीदरम्यान शाहरूखच्या डोळ्यांत अश्रू होते अशी माहिती आता समोर आली आहे.. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊ.

संजय सिंह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार एसआयटी प्रमुख या नात्याने २४ नोव्हेंबर २०२१ ला संजय सिंग यांनी आर्यन खानला चौकशीसाठी बोलावले. नवी मुंबईत असलेल्या सीआरपीएफच्या युनिट ऑफिसमध्ये ही भेट झाली… कमांडोंच्या सशस्त्र पहाऱ्याने सज्ज असलेल्या या सेफ जागेत संजय सिंह आणि आर्यन खान एकमेकांना भेटले. आर्यन खान समोर येताच संजय सिंह यांनी त्याला समोरच्या खुर्चीवर शांतपणे बसायला सांगितलं. आणि संजय सिंह यांनी आर्यन खानला प्रश्न विचारण्यास सुरवात केली..

आर्यन खान

आर्यन खान

या चौकशीदरम्यान संजय सिंह यांना आर्यन खानने दिलेली उत्तरं अवाक करण्यासारखी होती.. आर्यन खान म्हणाला की माझ्याकडे ड्रग्जचे कोणतेही पुरावे सापडलेले नसतानाही मला यात नाहक गुंतवण्यात आलं आहे. माझ्यावर लावलेले चार्जेस तुम्हांला जास्त वाटत नाहीत का…? पुरावा नाही, ड्रग्ज सापडले नाहीत तरी मला का अटक करण्यात आली? मला लगेच आंतरराष्ट्रीय तस्कर म्हणून संबोधण्यात आलं. कोणतीही चूक नसताना माझी इमेज खराब करण्यात आली. हे नुकसान न भरून काढण्यासारखं आहे.

या सगळ्या चर्चेदरम्यान संजय सिंह यांना आर्यन खानच्या एका गोष्टीमुळे थक्क झाल्यासारखं वाटलं. आर्यन खानने NDPS अॅक्टचा पूर्णपणे अभ्यास केला होता. त्यानुसार तो त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन अभ्यासपूर्ण करत होता.. आर्यनने एनसीबीच्या अटकेत असताना त्याच्यावर जो गुन्हा दाखल केला होता त्य़ाची कॉपी मागवली होती आणि त्याचा त्याने व्यवस्थित अभ्यास केला होता. कुठल्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा असते याची माहिती त्याने मिळवली होती. याचदरम्यान माहिती देताना आर्यन खानने संजय सिंग यांना महत्वाची माहिती दिली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या ड्रग्जचं प्रमाण कागदोपत्री त्याच्यासमोर वाढवलं ही होतं. हे सगळं त्याच्या नजरेसमोर घडत होतं.

आर्यन खानने हे मान्य केलं की कँलिफोर्नियामध्ये असताना तो गांजा ओढायचा, कारण त्याला निद्रानाशाचा त्रास होता.. आणि अमेरिकेत गांजा ओढणं हे लिगल आहे… याच दरम्यान एसआयटीचे प्रमुख संजय सिंग यांना भेटण्याची विनंती शाहरूख खानने केली होती.. ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या इतर मुलांच्या पालकांनाही ते भेटले होते. त्यामुळे शाहरूख खानला भेटण्यात संजय सिंग यांना कसलीच अडचण नव्हती..

अशाप्रकारे २४ नोव्हेंबर २०२१ ला आर्यन खानची भेट झाल्यावर , थोड्याच वेळात नवीमुंबईतील सीआरएफच्या कार्यालयात त्याच ठिकाणी संजय सिंग यांनी शाहरूख खानची भेट घेतली. आपल्याला भेटल्याबद्दल शाहरूखने संजय सिंग यांचे आभार मानले, आर्यनला या प्रकरणात मानसिक त्रासातून जावं लागतंय आणि त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटतेय असं शाहरूख म्हणाला. शाहरूखनेही मान्य केलं की त्याला निद्रानाशाचा त्रास आहे. त्यामुळे आर्यन रात्रभर जागा असतो. आणि त्याचमुळे मी सुद्धा त्याच्यासोबत रात्रभर वेळ घालवतो. कोणताही पुरावा आर्यनविरोधात मिळाला नसूनही त्याला नाहक या प्रकरणात गोवलं जातंय असं शाहरूख सारखं म्हणत होता. हे सर्व संभाषण संजय सिंग यांच्यासोबत सुरू असताना शाहरूख खानच्या डोळ्यांत अश्रू होते.

संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूख खूप भावूक झाला होता. तो पुढे म्हणाला की आम्हांला गुन्हेगार,राक्षस, समाज नष्ट करणारे अशी प्रतिमा बनवली जातेय. आम्हांला आमची दैनंदिन कामं करणंही खूप जड जातंय. मिटींग संपता संपता शाहरूखने संजय सिंग यांना आर्यनचा आज वाढदिवस आहे अशी माहिती दिली. संजय सिंग यांना ही गोष्ट माहित नव्हती म्हणून शाहरूखची दिलगीरी व्यक्त केली आणि ही मिटींग आपण पुन्हा केव्हा तरी केली असती असं सांगितलं. संजय सिंग यांनी शाहरूख समोर प्रस्ताव ठेवला की मी केक मागवतो. मात्र शाहरूखने हा प्रस्ताव नाकारला. तुम्ही तुमचा वेळ दिलात, आपुलकीने बोललात, आमच्या कठीण काळात आम्हांला समजून घेतलंत हेच आर्यन खानच्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे असं तो म्हणाला.. त्यानंतर संजय सिंग यांची भेट घेऊन शाहरूख खान निघून गेला..

शाहरूख खान आणि आर्यन खान यांची एसआयटी प्रमुख संजय सिंग यांच्यासोबतची ही कथित भेट अजून जगासमोर आली नव्हती मात्र इंडिया टुडेच्या माध्यमातून ही भेट आता जगासमोर आली आहे. ज्यात आपल्या मुलाच्या सुटकेसाठी शाहरूख खानच्या डोळ्यात अश्रू होते ही बाब आता समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.