Home » महाराष्ट्र » रुपया विक्रमी तळात, ‘सेन्सेक्स’ची हजारअंशी लोळण ; अमेरिकेतील चलनवाढीचे जगभर परिणाम; महागाईची नवी चिंता

रुपया विक्रमी तळात, ‘सेन्सेक्स’ची हजारअंशी लोळण ; अमेरिकेतील चलनवाढीचे जगभर परिणाम; महागाईची नवी चिंता

रुपया-विक्रमी-तळात,-‘सेन्सेक्स’ची-हजारअंशी-लोळण-;-अमेरिकेतील-चलनवाढीचे-जगभर-परिणाम;-महागाईची-नवी-चिंता

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही ११ पैसे घसरण होऊन तो ७७.८५ या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला.

मुंबई : अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात शुक्रवारी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर होऊन सेन्सेक्समध्ये १००० अशांची पडझड झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही ११ पैसे घसरण होऊन तो ७७.८५ या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला.

सत्रारंभापासून नकारात्मक कल राहिलेल्या सप्ताहाच्या अखेरच्या व्यवहारात सेन्सेक्स १,०१६.८४ अंशांनी म्हणजेच १.८४ टक्क्यांनी घसरत ५४,३०३.४४ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक, निफ्टीमध्ये २७६.३० (१.६८ टक्के) अंशांची घसरण झाली आणि तो १६,२०१.८० पातळीवर स्थिरावला.

महागाईच्या भीतीने देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदार चिंतेत आहेत. येत्या आठवडय़ात अमेरिकेतील महागाई दर आणखी वाढण्याची भीती आणि फेडरल रिझव्‍‌र्ह व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी आधीच समभाग विक्रीला प्राधान्य दिले आहे. स्थानिक बाजारातील व्यवहार आटोपल्यावर, भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी अमेरिकेतील किरकोळ किमतीवर महागाई दर नव्याने ८.६ टक्के या अत्युच्च पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे युरोपीय मध्यवर्ती बँकेने आपल्या धोरण बैठकीत पुढील महिन्यापासून दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तर येत्या सप्टेंबरमध्ये मोठय़ा बदलाचे सूतोवाच केल्याने जगभरातील भांडवली बाजारात विक्रीची लाट आली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

शेअर बाजारात कोटक बँकेच्या समभागात सर्वाधिक ४ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, इन्फोसिस, टेक मिहद्र, टाटा स्टील आणि टीसीएसचे समभाग घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज, टायटन आणि इंडसइंड बँकेचे समभाग मात्र तेजी दर्शवत होते.

सार्वकालिक तळ..

जोखीमदक्ष बनलेल्या मुख्यत: विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात केलेल्या समभाग विक्रीचा जबर फटका परकीय चलन बाजारालाही बसला. परकीय भांडवलाला देशाबाहेर पाय फुटल्याने शुक्रवारी रुपया प्रति डॉलर ११ पैसे घसरणीसह ७७.८५ या नव्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर गेला. आंतरबँक परकीय चलन बाजारात शुक्रवारच्या सत्रात रुपयाने ७७.८१ या नीचांकापासूनच व्यवहारास सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने ७७.७९ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला, तर नंतर ७७.८७ हा ऐतिहासिक तळ गाठला होता.

निर्देशांक घसरण कारण..

देशात गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक कोसळले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य, खनिज तेलाचे वाढते दर आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अथकपणे सुरू असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे निर्देशांकातील घसरण अधिक वाढली.

Leave a Reply

Your email address will not be published.