Home » महाराष्ट्र » मतमोजणीचा खोळंबा ; राज्यसभा निवडणुकीतील मतदानावर दोन्ही बाजूंचे आक्षेप

मतमोजणीचा खोळंबा ; राज्यसभा निवडणुकीतील मतदानावर दोन्ही बाजूंचे आक्षेप

मतमोजणीचा-खोळंबा-;-राज्यसभा-निवडणुकीतील-मतदानावर-दोन्ही-बाजूंचे-आक्षेप

भाजपने तीन मतांवर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी फेटाळून लावला.

मुंबई : अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदानावर भाजपने, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष रवी राणा यांच्या मतदानावर महाविकास आघाडीने तांत्रिक मुद्दय़ांवर आक्षेप घेत ही मते बाद करण्याची मागणी केल्याने मतमोजणी मध्यरात्रीपर्यंत खोळंबली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराला मुद्दामहून भाजपने अडकविल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. पराभव दिसू लागल्याने भाजप रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला. मुंबईतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळल्यावर भाजप आणि महाविकास आघाडीने नवी दिल्लीत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी नोंदविल्या. त्यावर रात्री उशिरापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगात खल सुरू होता.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत छोटे पक्ष आणि अपक्षांची मते मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. काही वेळ सुरळीतपणे मतदान झाल्यावर नाटय़मय घडामोडी घडत गेल्या. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतपत्रिकेबाबत लगेचच भाजपने आक्षेप नोंदविला होता. परंतु महाविकास आघाडीने लगेचच आक्षेप नोंदविला नव्हता, याकडेही भाजपतर्फे लक्ष वेधण्यात येत आहे.

भाजपने तीन मतांवर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी फेटाळून लावला. मतमोजणी सायंकाळी ५ वाजता सुरू होणार होती. मतमोजणीसाठी नवी दिल्लीतून निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असते. त्याच वेळी नवी दिल्लीत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन तीन मते बाद करण्याची मागणी केली. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून मतदानाच्या वेळी केलेले चित्रीकरण मागवून घेतले. 

मतपत्रिकेची गुप्तता महत्त्वाची

आमदाराने अधिकृत निवडणूक प्रतिनिधीशिवाय अन्य कोणालाही मतपत्रिका दाखवायची नसते आणि हाताळण्यासही द्यायची नसते. पण आव्हाड आणि ठाकूर यांनी ती हाताळण्यास दिल्याचा भाजपचा आक्षेप आहे. तसेच आक्षेप महाविकास आघाडीने मुनगंटीवार आणि रवी राणांबाबत नोंदविले आहेत. भाजपने पद्धतशीरपणे हा डाव रचल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

गुजरातमध्ये दोन काँग्रेस आमदारांची मते याच कारणाने रद्द करण्यात आली होती याचा दाखला निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारीत देण्यात आला आहे. यामुळेच ही तीन मते बाद करावीत, अशी मागणी मुख्तार अब्बास नकवी, गजेंद्रसिंह शेखावत आणि जितेंद्र सिंह या भाजपच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली.

राज्यसभा मतदानाप्रक्रियेत मी कोणताही चूक केलेली नाही. योग्य प्रकारे मतदान केले आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येत असल्याचे लक्षात आल्यावर विनाकारण गोंधळ घालण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राजकारणात ज्या प्रकारे गोंधळ निर्माण करण्याचे आणि वातावरण गढूळ करण्याचे काम भाजप करतो तसाच प्रकार ते मतदान प्रक्रियेत करत आहेत. ही मंडळी राजकारण आणखी किती खालच्या पातळीला नेणार आहेत कळत नाही.

यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

मी मतदान प्रक्रियेचे पालन केलेले आहे. माझे मत बाद ठरेल अशी कोणतीही कृती केलेली नाही. मतदानप्रक्रियेचा भंग माझ्याकडून झालेला नाही, असे मला वाटते. भाजपला पराभव दिसू लागल्याने उगाचच काहीही आरोप केले जात आहेत.

 – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

मी मतदान केल्यानंतर नियमाप्रमाणे केवळ प्रतोदांना मतपत्रिका दाखवली इतर कोणालाही दाखवली नाही. चित्रीकरण तपासल्यावर ते स्पष्ट होईल. भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील एकेका आमदाराला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. त्यात मी आहे. गरज पडल्यास मी स्वत: मतदानाचे चित्रिकरण मागेन.

सुहास कांदे, आमदार, शिवसेना

परस्परांविरोधात तक्रारी

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी स्वपक्षाच्या प्रतिनिधींबरोबरच दुसऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींना मतपत्रिका दाखविली. तसेच मतपत्रिका पक्षाच्या प्रतिनिधींच्या हाती दिल्याचा आक्षेप भाजपच्या वतीने घेण्यात आला. काँग्रेसनेही भाजप आणि अपक्ष आमदारांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी अन्य पक्षाच्या प्रतिनिधींना मतपत्रिका दाखविली होती. तर अपक्ष रवी राणा यांनी हनुमान चालीसा हे धार्मिक पुस्तक दाखवीत अन्य मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

मते बाद होण्याचा इतिहास..

पक्षाने नियुक्त केलेला प्रतिनिधी वगळता अन्य कोणाला मतपत्रिका दाखविल्यास मत बाद होऊ शकते. २०१६ मध्ये हरियाणात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीशिवाय अन्य कोणाला मतपत्रिका दाखविल्याने त्यांचे मत बाद ठरविण्यात आले होते. गुजरातेत २०१७ मध्ये काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी मतपत्रिका भाजपच्या प्रतिनिधीला दाखविल्याने दोन मते बाद झाली होती. मतपत्रिका अन्य कोणाला दाखविता येत नाही किंवा हाताळण्यास देता येत नाही.

महाराष्ट्र : ६

महा. आघाडी    :      —

भाजप  :      —

निकाल प्रलंबित

राजस्थान :     ४

काँग्रेस  :      ०३

भाजप  :      ०१

कर्नाटक :      ४ 

भाजप  :      ०३

काँग्रेस :      ०१

हरियाणा : २ 

काँग्रेस  :      —

भाजप  :      —

निकाल प्रलंबित

Leave a Reply

Your email address will not be published.