Home » महाराष्ट्र » परिवहन विभागाच्या आणखी ६ सेवा ऑनलाइन ; वाहनचालकांच्या वेळेची बचत

परिवहन विभागाच्या आणखी ६ सेवा ऑनलाइन ; वाहनचालकांच्या वेळेची बचत

परिवहन-विभागाच्या-आणखी-६-सेवा-ऑनलाइन-;-वाहनचालकांच्या-वेळेची-बचत

परिवहन विभागातर्फे अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात. यातील ८४ सेवा ऑनलाइन केल्या आहेत.

मुंबई : परिवहन विभागाने अनुज्ञप्ती (लायसन्स) नूतनीकरण, पत्ता बदलणे, अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण (डु्प्लिकेट) यासह सहा सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्याची सुरुवात गुरुवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते परिवहन आयुक्त कार्यालयात करण्यात आली. यामुळे अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यावेळी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणेही उपस्थित होते.

परिवहन विभागातर्फे अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात. यातील ८४ सेवा ऑनलाइन केल्या आहेत. मात्र दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता अर्ज, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालकाच्या अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण,  पत्ता बदल,  नूतनीकरण या सेवांसाठी अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात खेटे घालावे लागत होते. यामध्ये चालकांचा वेळ खर्च होत होता. मात्र गुरुवारपासून या सेवाही ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.

‘‘या सेवांचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे आधारकार्ड आणि त्यावरील अचूक भ्रमणध्वनी क्रमांक आवश्यक आहे,’’ असे  अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी, टुरिस्ट टॅक्सी, प्रवासी बससह नव्याने नोंदणी होणाऱ्या सर्वच सार्वजनिक वाहनांना ‘पॅनिक बटन’ आणि ‘व्हेईकल ट्रॅकिंग’ यंत्रणा दोन वर्षांपूर्वी बंधनकारक करण्यात आली होती. परंतु ही यंत्रणा हाताळण्यासाठी राज्य सरकारने अद्यापही मुख्य नियंत्रण कक्षच स्थापन केलेले नाही.

याबाबत अनिल परब यांनी सांगितले की, ज्या कंपन्यांचे ‘सॉफ्टवेअर’ आहे, त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. याचे काम प्रगतीपथावर असून याची लवकरच अंमलबजावणी होईल.

अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र टपालाद्वारे पाठवणार

अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्म तारीख आणि भ्रमणध्वनी क्रमांक याची खातरजमा झाल्यानंतर ऑनलाइन करण्यात आलेल्या सहा सेवांकरिता अर्जदारास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र हे अर्जदारास टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होणार आहे. कागदपत्रांचीही प्रत काढण्याची आवश्यकता राहणार नाही. या सेवेचा फायदा २० लाख नागरिकांना मिळेल, अशी आशा परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली. 

1 thought on “परिवहन विभागाच्या आणखी ६ सेवा ऑनलाइन ; वाहनचालकांच्या वेळेची बचत

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed