'महामोर्चा' ऐवजी मराठा मोर्चाचा व्हिडीओ? संजय राऊत ट्रोल; संभाजीराजेंनीही केली कानउघडणी

'महामोर्चा'-ऐवजी-मराठा-मोर्चाचा-व्हिडीओ?-संजय-राऊत-ट्रोल;-संभाजीराजेंनीही-केली-कानउघडणी

मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा व्हिडीओ ट्विट करण्याऐवजी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्विट केल्याचं म्हणतं नेटकऱ्यांकडून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत जोरदार ट्रोल होत आहेत. याच व्हिडीओवरुन आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही संजय राऊत यांची कानउघडणी केली आहे.

नेमकं काय झालं?

शनिवारी महाविकास आघाडी महामोर्चा पार पडला. महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काही वादग्रस्त विधानं, भाजप नेत्यांकडून केली गेलेली काही वक्तव्य, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प या सगळ्याचा निषेध म्हणून शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांकडून या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भव्य मोर्चा झाल्याचा दावा करण्यात आला.

मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅनो मोर्चा’ म्हणून या महामोर्चाची खिल्ली उडवली. या मोर्चाचं कुठलं विराट स्वरूप उद्धवजींना दिसलं? जसा त्यांचा पक्ष नॅनो होत आहे, तसा मोर्चा ही नॅनो झाला, अशी टीका फडणवीस यांनी केली.

संजय राऊत यांचा व्हिडीओ मराठा मोर्चाचा?

त्यावर आज संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन फडणवीस यांना उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. जय महाराष्ट्र! असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं. परंतु हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चाचं असल्याचं म्हटलं जातं आहे. त्याबाबत अनेक व्हिडीओ संजय राऊत यांच्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी कमेंट केले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनीही ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा! असं म्हणतं राऊत यांची कानउघडणी केली. संभाजीराजे म्हणाले, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा!

@rautsanjay61 ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा !

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2022

भाजपनेही केली टीका :

राऊत यांच्या व्हिडीओवर भाजपकडूनही टीका करण्यात आली. आपल्या राज्यात मानसोपचार तज्ज्ञांची काही कमी नाही. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या उपचारासाठी मदत करावी. राऊतांनी २०१७ चा मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ टाकून, ‘मविआ’चा मोर्चा आहे असं दाखवून, स्वतःची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असचं सांगत आहेत, असं भाजपनं म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *