'मविआ'च्या 'महामोर्चा'ला अशोक चव्हाणांची दांडी : काय सांगितलं कारण? भूमिकाही केली स्पष्ट

'मविआ'च्या-'महामोर्चा'ला-अशोक-चव्हाणांची-दांडी-:-काय-सांगितलं-कारण?-भूमिकाही-केली-स्पष्ट

नांदेड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काही वादग्रस्त विधानं, भाजप नेत्यांकडून केली गेलेली काही वक्तव्य या सगळ्याचा निषेध म्हणून शनिवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा राज्यव्यापी महामोर्चा निघणार आहे. यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वंच प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

मात्र याच मोर्चाला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मात्र त्यापूर्वीच अशोक चव्हाण यांनी ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील.
कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी.

— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 16, 2022

याबाबत बोलताना चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. पण माजी आमदार अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण मागच्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. गणपतीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचीही चर्चा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी ही भेट नाकारली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार या चर्चांना बळकटी मिळाली होती. मात्र त्यानंतर अद्यापही अशोक चव्हाण काँग्रेसमध्येच आहेत. तसंच त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *