Home » मनोरंजन » कंगना रनौतची आता जावेद अख्तर प्रकरणात हायकोर्टात याचिका

कंगना रनौतची आता जावेद अख्तर प्रकरणात हायकोर्टात याचिका

कंगना-रनौतची-आता-जावेद-अख्तर-प्रकरणात-हायकोर्टात-याचिका

जावेद अख्तर यांच्या तक्रारीवरून दंडाधिकारी कोर्टानं सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी.

दंडाधिकाऱ्यांची कारवाई आरोपीच्या कायदेशीर हक्कांवर गदा आणणारी असल्याचा कंगनाचा आरोप.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतनं पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देत ती रद्द करावी अशी मागणी कंगनानं या याचिकेमार्फत हायकोर्टात केली आहे.  

कंगनाने दाखल केलेल्या या याचिकेमध्ये तिच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयानं बजावलेले आदेश आणि सर्व समन्सला तसेच सुरू केलेल्या कारवाईलाही अॅड. रिझवान सिद्दिकीमार्फत आव्हान दिले आहे. तसेच न्याय दंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना या तक्रारीबाबत चौकशीचे निर्देश देण्याऐवजी, तक्रारदार जावेद अख्तर आणि साक्षीदारांच्या साक्षींची आधी पडताळणी करणं आवश्यक होतं, असं याचिकेतून नमूद केलेलं आहे. तसेच न्याय दंडाधिकाऱ्यांनी उघडपणे पोलीस यंत्रणेचा वापर करून बेकायदेशीररित्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत असा आरोपही कंगनानं या याचिकेतून केला आहे. यामुळे आरोपींच्या अधिकारांचे रक्षण करण्यास दंडाधिकारी अपयशी ठरले असून हा प्रकार आरोपींच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर गदा आल्यासारखा असल्याचंही कंगनानं म्हटलेलं आहे. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी गोळा केलेले साक्षीदारांचे जबाब हे बेकायदेशीर असल्याचं जाहीर करून दंडाधिकारी न्यायालयानं सुरू केलेल्या कारवाईवर स्थगिती द्यावी अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.  

काय आहे कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातला वाद
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलावून ऋतिक रोशन प्रकरणात आपल्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांचा आवाज खूप जास्त चढला होता, त्यामुळे आपला थरकाप उडाल्याचा दावा कंगनानं या मुलाखतीत केला होता. कंगनाची बहिण रंगोलीनंही याला दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट केल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी आता कायदेशीर मार्ग स्वीकारत दिंडोशी सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याची दखल घेत यावर्षी मार्च महिन्यात अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रनौतला जामीनपात्र वॉरंटही बजावलं होतं. त्यानंतर कंगनानं न्यायालयात उपस्थित राहून जामीन मिळवला होता. तर एप्रिल महिन्यात कंगनाने दिंडोशी सत्र न्यायालयात या वॉरंटविरोधात धाव घेतली. मात्र, तिची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर कंगनानं खटल्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याविरोधात मागणी केली होती जी अदयापही न्यायप्रविष्ट आहे.

Tags: Mumbai Kangana Ranaut javed akhtar Andheri Magistrate court defamation matter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed