बेशरम रंग गाण्याच्या विवादात पठाणमधील दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लुक

मुंबई, 20 डिसेंबर : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’मुळे सध्या चांगलाच वादात सापडला आहे. शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं रिलीज झाल्यापासून चित्रपटाला विरोध होत आहे. या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं जात आहे. प्रत्येक क्षेत्रातून आणि देशातील अनेक ठिकाणावरुन या चित्रपटाला विरोध केला जात आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सध्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या अडचणी वाढल्या असल्याचं दिसत आहे. अशातच आता ‘पठाण’ च्या दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.
‘पठाण’च्या ‘बेशराम रंग’ या पहिल्या गाण्यावरील वाद अजूनही संपलेला नाही, तेवढ्यातच निर्मात्यांनी आज ‘झूम जो पठाण’ या दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ज्यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. हे गाणे परवा म्हणजे 22 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. ‘झूम जो पठान’ ही आधुनिक फ्यूजन कव्वाली आहे जी तुम्हाला नाचायला लावेल असा निर्मात्यांचा दावा आहे.
हेही वाचा – Besharam Rang Controversy: कोणी घालायला लावली दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी? समोर आलं नाव
या गाण्यात शाहरुख खानचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. या गाण्यातसुद्धा दीपिका आणि शाहरुखची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘पठाण’च्या ‘झूम जो पठाण’ या दुसऱ्या आगामी गाण्याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले कि, ‘झूम जो पठाण…’ हे गाणे ‘पठाण’चे व्यक्तिमत्त्व दाखवणारे गाणे आहे. हे जे शाहरुखवर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे या सुपर स्पाय पठाणच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवणार आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी पुढे स्पष्ट केले की ‘विशाल-शेखरचं संगीत असलेलं हे गाणं ही एक आधुनिक फ्यूजन कव्वाली आहे आणि पठाणची शैली साजरी करते. या गाण्याची ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास कोणालाही त्याच्या सुरांवर नाचवू शकतो.’
दीपिका पदुकोण देखील या गाण्यात दिसणार आहे. याशिवाय या गाण्यात दीपिकासोबत शाहरुख खान सलमान खानसोबत डान्स करणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटात सलमान खान पाहुण्या भूमिकेत दिसणार हि बाब आता स्पष्टच झाली आहे. त्यामुळे सलमान खान आणि शाहरुख खान एका गाण्यात एकत्र दिसणार अशा चर्चा रंगात आहेत. आता शाहरुख आणि सलमान एकत्र येणार म्हटल्यावर प्रेक्षकांना डबल धमाका पाहायला मिळेल यात शंका नाही. त्यामुळे या गाण्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.