बेळगावात महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, फडणवीसांचा बोम्मईंना फोन

बेळगावात-महाराष्ट्राच्या-गाड्या-फोडल्या,-फडणवीसांचा-बोम्मईंना-फोन

मुंबई, 06 डिसेंबर : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावर आज ठिणगी पडली आहे. कन्नड रक्षक वेदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली आहे. या प्रकरणाची तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करून नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देण्याऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे.

(ज्यांना भरभरून दिले त्यांनीच कोकणावर अन्याय केला, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा)

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.

दरम्यान, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. आपण शेजारी शेजारी आहोत. शत्रू राष्ट्रासारखे एकमेकांवर हल्ले करायचे का. आमचं आम्हाला मिळेल, तुमचं तुम्हाला मिळेल. पण जर असं हातघाईवर आले तर दोन्हीकडून प्रतिक्रिया मिळतील. पण हे योग्य नाही. आम्ही केंद्राकडे अमित शहा यांच्याकडे आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असं गिरीश महाजन म्हणाले.

(‘साहेबांच्या पाठीवरील वळ पाहून सगळेच हळहळले,’ सुप्रिया सुळेंची बेळगाव लढ्याबद्दल पोस्ट)

कानडी संघटना या जास्त करत आहे. आपण सांमजस्याची भूमिका घेतली आहे. आपण दौरा लांबणीवर टाकली आहे पण त्यांच्याकडून वाद पेटवला जात आहे. हे योग्य नाही. सरकार दोन्हीकडे आहे. पण नियमांनुसार जे आमचं आहे ते आमचं आहे. त्यावर वाद घालणे योग्य नाही. आमचा जो अधिकार आहे. तो कुणालाही मिळू देणार नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले.

बेळगावात काय घडलं?

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्ता रोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *