बापरे! आता मासे-खेकड्यांनाही कोरोना? कोव्हिड टेस्टचा VIDEO आला समोर

बीजिंग, 19 ऑगस्ट : कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत सावध केलं आहे. त्यात आता चिंतेत भर टाकणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मासे आणि खेकड्यांचीही कोरोना टेस्ट केली जाते आहे. त्यामुळे मासे-खेकड्यांनाही कोरोना झाला की काय? सी-फूडमधूनही कोरोनाचा धोका आहे की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. या व्हिडीओमुळे दहशत वाढली आहे.
माणसात कोरोना कुठून आला हे अद्याप माहिती नाही. तो वटवाघळातून किंवा लॅबमधून आला असावा अशा दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत. माणसांप्रमाणे काही प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची मोजकी प्रकरणं समोर आली. आता तर मासे-खेकड्यांनाही कोरोना झाला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण या जीवांच्या कोरोना टेस्टचा व्हिडीओ समोर आला आहे.
हे वाचा – कोरोनाचा खात्मा नाहीच! बळींचा आकडा पाहून WHO सुद्धा हादरलं; जगाला केलं अलर्ट
ज्या चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला तिथं आता कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागल्याने सरकारने नियम कठोर केले आहेत. माणसांच्या कोरोना टेस्ट तर केल्या जातच आहेत पण सोबतच आता मासे आणि खेकड्यांचीही कोरोना टेस्ट होते आहे. मच्छिमारांसह त्यांनी पकडलेल्या सी-फूडचीही आरटी-पीसीआर टेस्ट करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
Videos of pandemic medical workers giving live seafood PCR tests have gone viral on Chinese social media. pic.twitter.com/C7IJYE7Ses
— South China Morning Post (@SCMPNews) August 18, 2022
व्हिडीओत पाहू शकता माणसांच्या नाक आणि घशात ज्यापद्धतीने कॉटन स्वॅब टाकून नमुने घेतले जातात. तसेच मासे आणि खेकड्यांचे नमुने घेतले जात आहेत. माशांच्या तोंडात स्वॅब टाकला जात आहे. तर खेकड्यांच्या शेलवर स्वॅब घासला जात आहे. त्यांचे नमुने घेणाऱ्यांनी पीपीई किटही घातला आहे. यावरून जलचरांमध्येही कोरोना पसरल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
हे वाचा – पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांपेक्षा घरच्या कोंबड्यांची अंडीच धोकादायक; संशोधनातून धक्कादायक खुलासा
हा व्हिडीओ पाहून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सी-फूडमधून कोरोनाचा धोका आहे की काय म्हणून बहुतेक लोक घाबरले आहेत, त्यांनी या टेस्टचं समर्थन केलं आहे. तर ज्या जीवांना फुफ्फुस नाही त्यांची कोरोना टेस्ट करण्यात काय अर्थ आहे, असं म्हणत याला विरोध केला आहे. काहींनी जर हे जीव कोरोना पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्यासाठी काय नियम असतील असा सवालही उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.