फडणवीसांचं कौतुक तर मुख्यमंत्र्यांवर संतापले अजित दादा, म्हणाले ही जबाबदारी…

मुंबई, 27 डिसेंबर : मागच्या आठवड्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये जोरदार गदारोळ पहायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभागृहातील अनुपस्थितीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा असतानाही मुख्यमंत्री गैरहजर असून त्यांच्याकडे 17 ते 18 खाती आहेत. त्यांच्या वतीने देवेंद्र फडणवसी उत्तर देत असल्याचे सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
अजीत पवार म्हणाले की, हिवाळी अधिवेशन सुरु होऊन प्रश्नोत्तराचा दुसरा आठवडा आणि दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांकडे मोठी आणि भरपूर खाती आहेत. त्यांच्या खात्याविषयी प्रश्नांची उत्तरे शंभूराज देसाई, उदय सामंत देत आहेत. उत्तरे कोणी द्यायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीसजी तुमच्याकडे सात ते आठ खाती आहेत. तुम्ही सगळ्या खात्यांसंबंधी उत्तरे देता. तुम्ही दुसऱ्या कोणाला उत्तर द्यायला सांगत नाही. तुम्ही तितके सक्षम आहात म्हणून देत असाल, असं अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा : ..तर संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई होईल; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
यानंतर सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले. दरम्यान यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला असता सभागृहात एकच हशा पिकला. मात्र या उत्तरामुळे अजित पवार संतापले आणि फडणवीसांना सुनावले.
त्यानंतर अजित पवार म्हणाले की हा हेतूआरोप नाही. प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री हजर असतील तर प्रशासनावरही एक दबदबा निर्माण होतो. कारण सगळे 30, 40 दिवस प्रश्न विचारत असतात. एखाद्या दिवशी दिल्लीत महत्त्वाचे काम आहे, त्यावेळी गेले तर समजू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी विधानपरिषदेत थांबले तरीही समजू शकतो. पण नगरविकास खात्यासंबंधी प्रश्न आहे. उल्हासनगरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं, कारण जलसंपदा विभागही त्यांच्याकडे आहे.
देवेंद्र फडणवीसजी तुम्हालाही आठवत असेल की, मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला हजर असले तर इतरांच्या उत्तरात हस्तक्षेप करत न्याय देऊ शकतात. आपण पाच वर्ष तसे करत होतात. ही एक परंपरा, पद्धत आहे. विधिमंडळाला न्याय, सन्मान आहे. आपण कायदे करतो, कायदेमंडळ आहे. कृपा करुन सरकार याची नोंद घेणार आहे का याचेही उत्तर द्या, असे अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा : Video : खोऱ्यानं खा, कधी खोक्यानं खा, शिंदेंनी खा.. विरोधकांचे टाळ घेऊन अनोखं आंदोलन
त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना तुम्ही सभागृह चालू देणार आहे हे माहितीच नव्हतं, अन्यथा मुख्यमंत्री हजर राहिले असते असा टोला लगावला. त्यावर सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हशा पिकला. आता सभागृह चालवत आहात तर मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो. आपलं म्हणणं योग्य असून मुख्यमंत्री उपस्थित राहतील असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.