प्रसिद्ध लेखिकेने साधला अभिषेकवर निशाणा;अभिनेत्याने उत्तर देताच डिलिट केलं ट्विट

मुंबई, 23 डिसेंबर : उत्तुंग कामगिरी केलेल्या कोणत्याही व्यक्तीची मुलं वडिलांच्याच क्षेत्रात आली, तर वडिलांशी त्यांची तुलना केली जाणं अपरिहार्य असतं. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामगिरीने एक मानदंड प्रस्थापित केला आहे. त्यामुळे त्यांना महानायक असं संबोधलं जातं. त्यांचा पुत्र अभिषेक बच्चनही सिनेक्षेत्रात आहे. त्याची वडिलांशी तुलना केली जाते. त्याच्या क्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांच्या यादीत प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांचाही आता समावेश झाला आहे. त्यांनी 22 डिसेंबरला ट्विटरवरून त्या संदर्भात भाष्य केलं; मात्र अभिषेक बच्चनने त्यावर उत्तर देऊन नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
नेमकं काय झालं, ते जाणून घेऊ या. अभिषेक बच्चनला अलीकडेच ‘दसवीं’ या चित्रपटासाठी अलीकडेच फिल्मफेअर ओटीटी अॅवॉर्ड्समध्ये बेस्ट अॅक्टर म्हणून पुरस्कार मिळाला. तसंच, त्या चित्रपटालाही बेस्ट फिल्म म्हणून पुरस्कार मिळाला. ‘दसवीं’ हा चित्रपट तुषार जलोटा यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात अभिषेक बच्चनसह निम्रत कौर, यामी गौतम यांचा समावेश होता. या चित्रपटात अभिषेक बच्चनने गंगाराम चौधरी या आठवी पास मुख्यमंत्र्याची भूमिका केली होती. त्याच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.
हेही वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीचा स्टनिंग लुक; तुम्ही ओळखलंत का?
या पुरस्कारानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून अभिषेकचं कौतुक केलं होतं. ‘माझा अभिमान, माझी खुशी… तू तुझा मुद्दा सिद्ध केला आहेस. तुझ्यावर अनेक जण हसले, तुझा अपमान केला गेला, खिल्ली उडवली गेली; पण तू मात्र शांतपणे, अजिबात गाजावाजा न करता आपलं काम नेटाने करत राहिलास. तू बेस्ट आहेस आणि कायम राहशील,’ अशा शब्दांत अमिताभ यांनी अभिषेकचं कौतुक केलं होतं.
हे एका वडिलांनी केलेलं आपल्या मुलाचं कौतुक होतं, तसंच एका ज्येष्ठ अभिनेत्याने नव्या पिढीतल्या एका अभिनेत्याचं केलेलं कौतुक होतं; मात्र हे कौतुक प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांना मात्र पसंत पडलं नाही. त्यांनी एक ट्विट करून आपलं मत मांडलं, किंबहुना अभिषेकच्या क्षमतेवर शंका घेतली.
‘अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेकवर इतकं प्रेम करतात, की त्यांना असं वाटतं, की त्यांच्यातलं सारं टॅलेंट त्याच्यातही आलं आहे आणि त्यांचा मुलगा बेस्ट आहे. अभिषेक चांगले आहेत; मात्र मला नाही वाटत, की अभिषेक अमितजींएवढे टॅलेंटेड आहेत,’ असं ट्विट तस्लिमा नसरीन यांनी केलं आहे.
हे ट्विट वाचल्यानंतर अभिषेक बच्चनला राग आला असता तर त्यात काही विशेष नव्हतं; मात्र त्याने या ट्विटला रागाने प्रत्युत्तर दिलं नाही. त्याने अत्यंत नम्रपणे आणि शालीनपणे तस्लिमा नसरीन यांना उत्तर दिलं. त्यामुळे त्याच्याबद्दल अनेकांना असलेल्या आदरात आणखी वाढ झाली.
ट्विट करूनच अभिषेकने तस्लिमा यांना उत्तर दिलं. ‘अगदी खरी गोष्ट आहे मॅडम. टॅलेंटच्या बाबतीत कोणीही त्यांच्याशी बरोबरी करू शकत नाही, तसंच अन्य कोणत्या बाबतीतही. ते कायमच ‘द बेस्ट’ राहतील. मी एक खूप अभिमान असलेला मुलगा आहे,’ असं ट्विट अभिषेक बच्चनने केलं. आपल्या ट्विटमध्ये अभिषेकने हात जोडलेल्या चिन्हाचा इमोजीही जोडला आहे. त्याच्या या उत्तराने साऱ्यांचंच मन जिंकून घेतलं. अभिनेता सुनील शेट्टीने या ट्विटवर ‘हार्ट’ रिअॅक्शन दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.