प्रसिद्ध गायकाच्या कार्यक्रमात गोंधळ; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये चाहते जखमी

मुंबई, 23 डिसेंबर : आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहण्यासाठी चाहते ठिकठिकाणी गर्दी करताना दिसून येतात. पण याच गर्दीमुळे अनेक ठिकाणी धक्काबुक्की, चेंगराचेंगरी होते तसेच काही ठिकाणी गर्दीही अनियंत्रित होताना दिसते. आता कोलकाता येथूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय गायक शान एका कार्यक्रमासाठी कोलकाता येथे पोहोचला होता. कार्यक्रमात गायकाला ऐकण्यासाठी अनेकांची गर्दी झाली होती. गर्दी जमल्याने पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
बॉलीवूडचा लोकप्रिय गायक शान हुगळीच्या उत्तरपारा येथील कॉलेजमध्ये लाइव्ह कॉन्सर्टसाठी पोहोचला होता. आता शान येणार म्हटल्यावर त्याला ऐकण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक शानला पाहण्यासाठी आतुर झाले होते. पण ही गर्दी नियंत्रणाबाहेर जाताना दिसली. कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक शानला पाहण्यासाठी खूपच उतावळे झाले होते. मग काय शान तेथे पोहोचताच एकच गोंधळ झाला. इतकाच नाही तर शानने त्याचे लोकप्रिय गाणे सावरिया आणि जब से तेरे नैना गायला सुरू केल्यानंतर तर परिस्थिती आणखीनच हाताबाहेर गेली.
हेही वाचा – Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; या आठवड्यात पुन्हा एंट्री घेणार अब्दू रोजीक
बिघडलेली परिस्थिती हाताळण्यासाठी शेवटी पोलिसांना यावं लागलं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मग लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये 4 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे प्रकरण शांत झाले. सुदैवाने, यादरम्यान शानला कोणतीही हानी झाली नाही. पोलिस वेळेवर पोहोचले नाही तर प्रकरण आणखी चिघळू शकले असल्याचे बोलले जात आहे.
या वर्षी मे महिन्यात गायक केके देखील कोलकात्यातील नजरल मंच येथे कार्यक्रमासाठी पोहोचले होते. लाइव्ह परफॉर्म करत असताना केके यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की केकेच्या मृत्यूचे कारण आयोजकांचे चुकीचे व्यवस्थापन होते.
मात्र, सेलिब्रिटींच्या कार्यक्रमात लाठीचार्ज होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत. कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व्यवस्था का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.