पुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून

पुण्यात-खूनाचे-सत्र-थांबेना,-गेल्या-15-दिवसात-12-जणांचा-खून

पुणे, 01 नोव्हेंबर: पुण्यात गेल्या पंधरा दिवसात १२ खूनाच्या घटना घडल्या आहेत. पूर्ववैमनस्य, प्रेमप्रकरण आदी कारणातून हे खून झाले आहेत. यात किरकोळ कारणावरून थेट टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसून येतंय. आता हे खूनसत्र थांबवण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. येरवड्यात लक्ष्मीनगर भागात दोघांवर कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

याप्रकरणी अनिल उर्फ पोपट भीमराव वाल्हेकर, सुभाष उर्फ पापा किसन राठोड अशी खून झालेल्यांची नावे आहेत. यातील आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेले दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही घटना ताजी असतानाच कोंढव्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आलाय. यात हत्या झालेल्याचे नाव सुमित उर्फ मोन्या जाधव असे आहे. मयत जाधव याच्याशी असलेल्या जुन्या वादातून तिघांनी मिळून जाधवला कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. विशेष म्हणजे या खुनाच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन आहेत.

हेही वाचा: रेहान कंपनीनं कशी केली पुणेकरांची फसवणूक? हजारो कोटींना घातला गंडा

मूळच्या बिहार राज्यातील आणि सध्या भोसरी येथे वास्तव्य करणाऱ्या तिघांनी फुरसुंगी भागात एका सुरक्षारक्षकाचा खून केला. काशिनाथ कृष्णा महाजन (वय ५२) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी करण्यासाठी त्यांनी सुरक्षारक्षक असलेल्या कर्मचाऱ्याचा तिघांनी मिळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

पूर्ववैमनस्यासह किरकोळ वाद आणि प्रेमप्रकरणातून चतुःशृंगी आणि लोणी काळभोर, चंदननगर भागात खुनाच्या घटना समोर आल्या. दारू पिण्याच्या कारणातून लोणी काळभोर भागात तर, करणी केल्याच्या संशयावरून एकाने आपल्याच नातेवाईक असलेल्या महिलेचा गळा चिरल्याची घटना चंदननगर भागात घडली. किरकोळ वादातून दोनच दिवसापूर्वी पानटपरीवर तरूणाचा खून झाला होता.

हेही वाचा: भाजप आमदार लोढांनी केली मुख्यमंत्र्यांची शिवरायांशी तुलना, केसरकरांनी केली पाठराखण

केवळ पूर्ववैमनस्यच नाही तर प्रेमप्रकरणातून औंध परिसरात महाविद्यालयीन तरुणीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून केल्यानंतर पसार झालेल्या तरुणाने देखील मुळशी परिसरातील एका जंगलामध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. चतुःशृंगी पोलिसांना तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे पोलिसांना रस्त्यावरचा धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *