पुणे पोलिसांची मुंबईत कारवाई, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

पुण्यातील एका महिलेला लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर शून्य टक्के व्याज लावून 50 लाख रुपयांचे आमिष दाखवत या सायबर चोरट्यांनी 2.50 लाख रुपयांना गंडा घातला.
बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
Image Credit source: TV9
पुणे : “नमस्ते, मी बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिक्युटिव्ह बोलतोय,” असे नागरिकांनी कॉल करुन आर्थिक फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मुंबईतील मुलुंड येथे जाऊन “बजाज फिसर्व्ह लाईफ इन्शुरन्स” नावाने चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले.
पुण्यात एका महिलेला घातला होता गंडा
पुण्यातील एका महिलेला लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर शून्य टक्के व्याज लावून 50 लाख रुपयांचे आमिष दाखवत या सायबर चोरट्यांनी 2.50 लाख रुपयांना गंडा घातला.
महिलेने तक्रार दिल्यानंतर फसवणूक उघडकीस
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मुंबईतील मुलुंड येथे हे कॉल सेंटर चालत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या कॉल सेंटरवर छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे.
घटनास्थळारुन मुद्देमाल जप्त
घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईल फोन, सिम कार्ड हे सर्व साहित्य पोलिसांना आढळून आलं. या कॉल सेंटरमध्ये तरुण तरुणी मिळून 40 जण संपूर्ण देशभरात लोकांना गंडा घालायचे.
पोलिसांकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
या संपूर्ण प्रकरणाच्या मागे दोन मुख्य सूत्रधार आहेत. त्या दोघांनी तिथे काम करत असलेल्या तरुणांना एक स्क्रिप्ट दिली होती. तुम्हाला येणारे फोन हे अशाच कुठल्या तरी बोगस कॉल सेंटरचे नाहीत ना हे तपासून घ्या. नाहीतर तुमचा बँक बॅलन्स संपलाच समजा. त्यामुळे अनोळखी नंबरवरुन आलेल्या फोनेपासून सावधान रहा.