न्यू इअर पार्टीसाठी मुंबईत आणलं जातंय हेरॉईन! मालवणी पोलिसांची मोठी कारवाई

न्यू-इअर-पार्टीसाठी-मुंबईत-आणलं-जातंय-हेरॉईन!-मालवणी-पोलिसांची-मोठी-कारवाई

50 लाख रुपये किंमतीचं 126 ग्रॅम हेरॉईन जप्त! मुंबईत नेमकं कुठून आलं हेरॉईन, वाचा सविस्तर

न्यू इअर पार्टीसाठी मुंबईत आणलं जातंय हेरॉईन! मालवणी पोलिसांची मोठी कारवाई, बाऊन्सरला अटक

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Image Credit source: TV9 Marathi

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालवणी पोलिसांनी एका 35 वर्षीय बाऊन्सरला 50 लाख रुपयांच्या हेरॉईनसह अटक केली आहे. न्यू इअर पार्टीच्या निमित्त ड्रग्ज विक्रीसाठी हे हेरॉईन आणण्यात आलं असल्याची शंका व्यक्त केली जाते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडील हेरॉईन हे राज्यस्थानमधून मुंबईत आणण्यात आलं असल्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या बाऊन्सरचं नाव सोहेल अहमद शेख असं आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या त्याची कसून चौकशी केली जाते आहे.

रफिक मैदानाजवळ एक व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येत असल्याची माहिती मालवणी पोलिसांनी होती. त्यानुसार पोलिसांनी मालवणी परिसरातील रफिक मैदानाजवळ एक पथक तैनात केलं होतं. सापळा रचून पोलिसांनी ड्रग्ज विक्री करण्याच्या इराद्यात असलेल्या व्यक्तीला रंगेहाथ पकडलं.

काही वेळानं आरोपी सोहेल शेख बॅग घेऊन रफिक मैदान इथं आला. पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 126 ग्रॅम इतक्या वजनांचं हेरॉईन सापडलं. या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 50 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी सोहेल अहमद शेख याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी सोहेल अहमद शेख याने सांगितले की, तो बाऊन्सर असून एका खासगी कंपनीत काम करतो, अशी माहिती मालवणी पोलीस स्थानकाचे एपीआय नीलेश साळुंखे यांनी दिली.

न्यू इअर पार्टीसाठी राजस्थान मधून मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येत असल्याचं या कारवाईमुळे अधोरेखित झालं आहे. अजूनही अनेकजण छोट्यामोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री करण्याच्या या रॅकेटमध्ये सामील असल्याची शंका उपस्थित केली जाते आहे. सोहेलच्या चौकशीतून आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीनेही पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *