“नोटाबंदी हे आर्थिक हत्याकांड, हजारो निष्पाप..” संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका

मुंबई, 3 जानेवारी : देशात झालेल्या नोटाबंदी सुप्रीम कोर्टाने वैध ठरवली आहे. मात्र, त्यानंतरही देशभरात या निर्णयावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशात नोटबंदी झाल्यानंतर हजारो मृत्यू झाले. त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी जे मत मांडलं त्यांच्याशी मी सहमत आहे. नोटबंदीमुळे हजारो लोक बँकेच्या रांगेत मरण पावले. नोटबंदीमुळे बेरोजगारीही निर्माण झाली, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नोटबंदीमुळे लाखो लोकांना रोजगार गमावावा लागला. लाखो लोकांचे अतोनात हाल झाले, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नोटाबंदी हे आर्थिक हत्याकांड : संजय राऊत?
आम्ही हा प्रश्न विचारत नाही की नोटाबंदी योग्य की अयोग्य. जे आर्थिक हत्याकांड नोटबंदीच्या निर्णयामुळे झालं त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक येऊन सांगितलं आज रात्रीपासून एक हजार आणि 500 रूपयांच्या नोटा बाद. नोटाबंदी केल्याने काळा पैसा बंद होईल, टेरर फंडिंग बंद होईल, अतिरेक्यांना पैसे पुरवणं बंद होईल, चलनातल्या बनावट नोटा संपुष्टात येतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, बनावट नोटांचं प्रमाण वाढलं आहे. काश्मीरसह देशभरात दहशतवाद संपलेला नाही. त्यांना करण्यात येणारं टेरर फंडिंग सुरुच आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नोटाबंदीनंतर काळा पैसा जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नोटबंदी योग्य कशी? त्यामुळे जस्टिस नागरत्ना यांनी जे मत मांडलं ते योग्य मत आहे. आम्ही त्या एका मताच्या बाजूने आहोत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
वाचा – “आशिष शेलार हे शंकराचार्य आहेत का?..” संजय राऊतांचा टोला म्हणाले, आधी भाजप नेत्याची..
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?
नोटाबंदीच्या विरोधात ज्या 58 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यासंदर्भातली सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टात पार पडली. या वेळी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने चार विरूद्ध एक अशा मताने नोटाबंदी वैध असल्याचा निर्णय दिला. न्याय. बी. व्ही नागरत्ना यांनी मात्र एक वेगळं मत आणि निरीक्षण नोंदवलं. नोटाबंदी ही सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता केली तसंच कोणत्याही शिफारसीशिवाय केली. त्यामुळे ती बेकायदेशीर आहे, असं मत त्यांनी मांडलं होतं, ज्याची चर्चाही झाली. आता संजय राऊत यांनीही नागरत्ना यांनी मांडलेलं मतच योग्य आहे असं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.