निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला धक्का; सर्वात मोठ्या देणगीदार कंपनीच्या मालकाला अटक


मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सर्वात मोठे देणगीदार असलेले व्हिडीओकॉन कंपनीचे मालक वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. आयसीआयसी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. यापूर्वी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती यांनाही यापूर्वी अटक केली आहे.
चंदा कोचर आयसीआयसी बँकेच्या सीईओ असताना व्हिडिओकॉन समूहाला 3, 250 कोटींचं बेकायदेशीरपणे कर्ज दिल्याचा आरोप आहे. या बदल्यात दीपक कोचर यांच्या न्यू रिन्यूएबल कंपनीला व्हिडीओकॉनमध्ये गुंतवणूक मिळाली होती. या प्रकरणी सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे दीपक कोचर यांना अटक केली आहे. यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आता याच प्रकरणात व्हिडीओकॉन कंपनीचे मालक वेणूगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली आहे.
ठाकरे कुटुंबीय आणि धूत यांचे जुने संबंध :
औरंगाबादमधून येणाऱ्या नंदलाल धूत यांनी व्हिडीओकॉनची स्थापना केली. तेव्हापासूनच ठाकरे कुटुंबीय आणि धूत कुटुंबीय यांचे जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जात. वेणूगोपाल धूत यांचा औरंगाबाद इथे एक प्रशस्त बंगला आहे. या बंगल्याचा अनेक राजकारणी, उद्योगपती वापर करत असतात. याच बंगल्यात औरंगाबादला आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेही यायचे, असं म्हटलं जातं.
राजकुमार धूत शिवसेनेकडून होते खासदार :
वेणूगोपाल धूत यांचे भाऊ आणि व्हिडीओकॉनचे सहमालक राजकुमार धूत हे शिवसेनेकडून तीन वेळा राज्यसभेचे खासदार होते. शिवसेनेने यापूर्वी चंद्रिका केणी, प्रतिश नंदी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या चेहऱ्यांना राज्यसभेवर पाठविलं आहे. याच नावात राजकुमार धूत यांचाही समावेश होतो. धूत हे २००२ ते २०२० या १८ वर्षांच्या काळात शिवसेनेकडून तीन टर्म खासदार होते.
व्हिडीओकॉन कंपनी शिवसेनेची सर्वात मोठी देणगीदार :
व्हिडीओकॉन ही कंपनी शिवसेनेची सर्वात मोठी देणगीदार आहे. २०१५-१६ मध्ये शिवसेनेला मिळालेल्या एकूण ८६.८४ कोटी रुपयांच्या देणग्यांपैकी एकट्या व्हिडिओकॉनने ८५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली होती.