ना मूल, ना संपत्तीवर अधिकार, केवळ पाणी भरण्यासाठी दुसरी बायको

मुंबई, 29 डिसेंबर : महाराष्ट्र तसं बऱ्यापैकी पर्जन्यमान असलेलं राज्य आहे. मात्र, या पर्जन्याचं भौगोलिक वितरण असमान असल्यामुळे अनेक गावांना आजही दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. काही गावांतील परिस्थिती एवढी भयानक आहे की, महिलांना आणि मुलींना जीवाची बाजी लावून पाणी भरावं लागतं. ठाणे जिल्ह्यातील डेंगनमळ गावाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गावात पाऊल टाकताच, डोक्यावर आणि कंबरेवर पाण्याचे हंडे-कळश्या घेऊन पाणी वाहणाऱ्या अनेक महिला दिसतात. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांमध्ये साधारणं हेच चित्र दिसतं. मात्र, डेंगनमळमधील महिलांची गोष्ट विशेष आणि धक्कादायक आहे. या गावातील अनेक पुरुषांनी फक्त पाणी भरायला माणूस असावा म्हणजे घरकामाला स्री असावी यासाठी दोन किंवा तीन लग्न केलेली आहेत. ‘दैनिक भास्कर’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील डेंगनमळ गावात साधारण 500 नागरिक राहतात. हे गाव गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करत आहे. विशेष म्हणजे राज्याची राजधानी मुंबईला पाणीपुरवठा करणारं बस्ता धरण या गावापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईतील रहिवाशांना पाइपलाइनद्वारे या धरणाचं सर्व पाणी मिळतं. मात्र, हेच धरण बांधणाऱ्या डेंगनमळ गावातील महिला पाण्याच्या एक-एका थेंबासाठी झगडत आहेत. याशिवाय, वैयक्तिक आणि मानसिक पातळीवर देखील या महिलांचा संघर्ष फार मोठा आहे.
हेही वाचा – प्रेमविवाहानंतर पहिल्याच रात्री समोर आलं पत्नीचं धक्कादायक सत्य, नवरदेवाची थेट पोलिसांत धाव
डेंगनमळ गावातील पाणी वाहणाऱ्या स्त्रिया विवाहित आहेत. पण, पती असूनही त्या आई होऊ शकत नाहीत. पतीच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार सांगू शकत नाहीत. कारण, त्यांना फक्त पाणी वाहण्यासाठी घरात आणलं जातं. या स्त्रियांना ‘वॉटर वाईव्ज’ किंवा ‘पानीवाली बाई’ म्हणतात. फक्त पाणी भरण्यासाठी लग्न करून आलेल्या अनेक स्त्रिया पाणी भरताना जखमी झाल्या आहेत. काहीजणी आजारी पडल्या आहेत.
गावातील सखाराम भगत ही अशीच व्यक्ती आहे जिनं पाण्यासाठी तीन लग्नं केली आहेत. सखारामला तुकी, साखी आणि रमा अशा तीन बायका आहेत. यापैकी फक्त पहिली पत्नी असलेल्या तुकीलाच पत्नी असल्याचे सर्व अधिकार मिळाले आहेत. तिला सहा मुलं आहेत. साखी आणि रमाशी फक्त पाणी वाहण्यासाठी लग्न केल्यामुळे त्यांना मुलं जन्माला घालण्याची परवानगी नाही. डेंगनमळ गावामध्ये असे अनेक ‘सखाराम’ आणि अनेक तुकी, साखी आणि रमा भेटतात.
याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता या भागाचे आमदार दौलत दरोडा सांगतात की, जल जीवन अभियानांतर्गत प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याच्या योजनेवर वेगानं काम सुरू आहे. मे 2024 पर्यंत गावकऱ्यांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर, शहापूर तालुक्याच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना या प्रकरणाची माहितीच नाही.
महाराष्ट्रातील पाणी संकटावर काम केलेले आणि जलभूषण पुरस्कारानं सन्मानित झालेले डॉ. प्रवीण महाजन म्हणतात की, बस्ता नदीवर बांधलेल्या धरणातून गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. पण, ग्रामपंचायतीचं बजेट कमी आहे. गावकऱ्यांनी गावात पाणी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मदत घेतली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.