सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : जमीन खोदताना सापडलेले सोन्याचे बिस्किटे विकायचे असल्याचे सांगून दोन व्यक्तीस १० लाख रूपयांना गंडवल्याची घटना सुरगाण्यात घडली. या प्रकरणी दादरा नगर हवेली जिल्ह्यातील सिलवासा येथील मुकेश चुनीलाल खोंडे (वय २६) यांनी सुरगाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी एक काळ्या रंगाची स्विफ्ट कारसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील कमलाकर सुरेश गांगुर्डे (रा. वडपाडा) रमेश देवाजी पवार (रा. मोकपाडा), सुरेश कनसे (रा. भोकरपाडा), रामदास मुडा, कांतीलाल पवार यांनी सिलवासा येथील मुकेश खोंडे व नारायण गुज्जर यांना सापडलेली सोन्याची  बिस्किट देण्याचा व्यवहार केला होता. १० लाख रुपयांना हा व्यवहार ठरला होता.

दरम्यान, २९ नोव्हेंबर रोजी सहा ते साडेसातच्या दरम्यान सुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोहाच्या झाडाजवळ मुकेश खोंडे व नारायण गुज्जर १० लाख रुपये घेऊन पोहोचले. त्यानंतर येथे काळया रंगाच्या कार ( क्र. एम.एच.०५ ए.बी. ६८५६) मधून चौघे जण आले आणि पोलिस असल्याचे सांगून छापा टाकला असल्याचे सांगत पिस्तुलचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर खोंडे व गुज्जर यांच्याकडील १० लाख रूपये बळजबरीने काढून घेतले.

याप्रकरणी पोलिसांनी रमेश देवाजी पवार व कमलाकर सुरेश गांगुर्डे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना दिंडोरी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व कळवण प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी करीत आहेत.

हेही वाचलंत का ?  

  • ‘मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही, तर काय कपाळ करावं’; एकनाथ शिंदेंवर अजितदादांचा हल्लाबोल
  • ‘मी कुणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या, पोलीस बाजूला करतो’, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
  • मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत रहा : काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेत्यांना सल्ला