बिबट्या www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळुंजेत 24 डिसेंबरला घराच्या दारातून सायंकाळी अरीश दिवटे या सहा वर्षाच्या बालकास उचलून फडशा पाडणार्‍या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने जंगलात विविध ठिकाणी लावलेल्या पाचपैकी एका पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, बालकाचा जीव घेणारा हा तोच बिबट्या का? याबाबत खात्री नसल्याने आणखी काही दिवस उर्वरित चार पिंजरे तसेच ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बिबट्या अडकला आणि वनखात्याने त्यास ताब्यात घेतले आहे. 24 डिसेंबरला वेळुंजेत अरीशला बिबट्याने उचलून नेले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्या बालकाचा मृतदेह घरापासून साधारणत: 500 मीटरवर आढळून आला होता. यापूर्वीदेखील धुमोडी येथे एका बालकावर हल्ला झाला होता. वनखात्याने खबरदारी म्हणून वेळुंजे भागात पाच पिंजरे लावले होते. जेथे बालकास टाकून दिलेले होते त्या जागेच्या जवळ ठेवलेल्या पिंजर्‍यात बिबट्या सोमवारी सकाळी अडकला. सोमवारी त्या बालकाचा दशक्रिया विधी होता. त्याच दिवशी सकाळी बिबट्या पिंजर्‍यात अडकला. बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थ जमा झाले होते.

  • राहुरी : बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात आज सकाळी 10.30 च्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करत एका आजारी बिबट्याला जाळीच्या साह्याने जेरबंद केले. या बिबट्यास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले. हा नरबिबट्या अंदाजे आठ ते नऊ वर्षांचा आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास काही नागरिकांना तळेगाव (तालुका इगतपुरी) येथील पाण्याच्या टाकीजवळ बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत माहिती देताच इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, मंडल अधिकारी भाऊसाहेब राव यांच्यासह पथकाने धाव घेत बिबट्याच्या हालचाली टिपल्या. या बिबट्याला चालण्यास त्रास होत असल्याचे व पोटाचा आजार असल्याचे निदर्शनास आले. वनपथकाने जाळी टाकून बिबट्याला ताब्यात घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक सुरेखा गुहाडे, एम. के. सय्यद, सोमनाथ जाधव, गोरख बागूल, स्वाती लोखंडे, मुज्जू शेख यांच्या पथकाने ऑपरेशन राबविले.

  • Nashik Leopard : बिबट्यासंगे सहजीवनाचा नवा अध्याय

वावी : सिन्नर तालुक्यातील फुलेनगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. फुलेनगर परिसरात दिवसेंदिवस बिबट्यांची दहशत वाढत आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी भरणे जिकिरीचे ठरत आहे. एक दोन नाही, तर तब्बल चार ते पाच बिबटे या परिसरात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी (दि. 1) सायंकाळी 6 ला खंडेराव नारायण पठाडे यांच्या शेतात वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्य शोधत असताना पिंजर्‍यामध्ये अडकला. फुलेनगरच्या पोलिसपाटील अर्चना भगत यांनी वनविभागाला माहिती कळविल्यावर सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव व वनपाल अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रमणी तांबे, वनसेवक नारायण वैद्य, संतोष मेंगाळ, जगन जाधव, मधुकर शिंदे आदी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या पिंजर्‍यासह ताब्यात घेऊन सकाळी 8 ला मोहदरी-माळेगाव शिवारातील वनोद्यानात रवाना केले. बिबट्या नर जातीचा असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. या अगोदरही विष्णू भगत यांच्या शेतात एक व वसंत पठाडे यांच्या शेतात एक असे दोन बिबटे जेरबंद झालेे आहेत.

हेही वाचा:

  • नाशिक : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे जोडे मारो आंदोलन
  • मुंबई : माजी नगरसेविका सुरेखा पाटील अखेर शिक्षिका पदावरून निलंबित
  • उर्फी माझ्या हाती लागली, तर तिला थोबडणारच, चित्रा वाघ भडकल्या