नाशिक
संग्रहीत छायाचित्र

उगाव (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील उगाव येथील विष्णुंपत माणिकराव पानगव्हाणे या शेतकऱ्याच्या तयार द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तिने घाव घालत नुकसान केल्याची बाब उघडकीस आली आहे. ऎन द्राक्ष हंगामाच्या तोंडावर तयार झालेला द्राक्षबाग उद्धवस्त करण्यात आली आहे.

निफाड तालुक्यातील उगांव येथील विष्णुपंत माणिकराव पानगव्हाणे यांनी दोन वर्षापुर्वी तीन एकरात काळ्या वाणाच्या द्राक्षबागेची लागवड केली होती. सदर द्राक्षबागेतील एंगल, ठिबक तार, बांबु यासह इतर उभारणी, मशागतीसाठी सुमारे दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. द्राक्षबागेची मशागत करुन चालू हंगामात सदर द्राक्षबागेवर विविध रोगप्रतिकारक औषधे, खते, नत्र देऊन लागवडीनंतरचे पहिलेच पीक आले होते.

या द्राक्षबागेतील सुमारे सत्तर झाडे ही मुळापासुन तोडून टाकल्याची बाब गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. द्राक्षबागेत नियमित मशागतीला जाणाऱ्या पानगव्हाणे कुटुंबाला द्राक्षघड सुकलेले दिसले. त्यावेळी बारकाईने पाहणी केल्यावर द्राक्षबागेच्या मुळावरच घाव घातल्याचे दिसून आले. अनपेक्षितरित्या घडलेल्या या विघातक घटनेमुळे पानगव्हाणे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

चालु हंगामात द्राक्ष बागांमध्ये दर्जेदार उत्पादन घेण्याकडे बागायतदारांचा कल आहे. त्यामुळे पोटतिडकीने द्राक्षबागांच्या मशागतीवर मोठा खर्च द्राक्ष बागायतदारांकडून केला गेला आहे. त्यातच अशा असुरी प्रवृत्तीमुळे द्राक्ष बागायतदारांचा परिवार हतबल होऊन गेला आहे.
– नंदकुमार पानगव्हाणे
संचालक महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग नाशिक

अधिक वाचा :

  • नांदेड : माहूर येथील गॅस सिलेंडरच्या स्फोटात मजुराचे घर जळाले
  • पुणे: बाईक टॅक्सी बंदसाठी आता बाबा आढावांची रिक्षा संघटना मैदानात
  • नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट !