'धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष', अखेरच्या दिवशीही शिवसेनेचा शिंदे गटावर वार

मुंबई, 31 डिसेंबर : ‘एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाह्य सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण. मावळत्या वर्षातील सरकारी दहशतवादाचा हा उच्छाद लोकशाहीचे तमाम स्तंभ उघड्या डोळ्यांनी पाहात राहिले. नव्या वर्षात तरी आंधळेपणाचा बुरखा पांघरलेली ही पट्टी सुटेल काय? असा सवाल करत शिवसेनेनं शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार वाद उफाळून आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.
‘कट-कारस्थाने, दगाबाजी, फसवणूक, कृतघ्नपणा हीदेखील अनादिकाळापासून चालत आलेली विकृती व प्रवृत्ती. भूतकाळाच्या उदरात तीही कधी गडप होत नाहीत. धोके वा षड्यंत्रे कितीही झाली तरी भविष्यकाळाबद्दल असलेल्या विश्वासातून काळ हेच अखेर त्यावर उत्तम औषध ठरते. संकटांवर मात करून बदल वा परिवर्तन घडवण्याची ऊर्जा बदलत्या काळाकडूनच मिळत असते. जुन्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करायचे असते ते यासाठीच’ असं म्हणत सेनेनं नव्याने लढाईचे संकेत दिले.
(मलाही तुरुंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला, फडणवीसांनी थेट अधिकाऱ्याचं नावचं घेतलं)
‘मावळत्या वर्षाचा धांडोळा घेताना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओढवलेले सर्वात मोठे संकट म्हणजे रशिया व युक्रेनचे युद्ध. जगभरातील अनेक देशांना या युद्धाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दुष्परिणाम भोगावे लागले. हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर मावळते वर्ष देशातील लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले. पाशवी बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेला, सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना भयभीत करण्याचे सत्रच गेले वर्षभर चालवले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा मीडिया एकतर सरकारने बगलबच्च्यांकरवी खरेदी केला किंवा धाकदपटशा दाखवून मुख्य प्रवाहातील साऱ्याच प्रसारमाध्यमांची तोंडे बंद केली, अशी टीका सेनेनं केली.
(‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, काही लोक जाणीवपूर्वक..’ अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं)
‘सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांचा वाटेल तसा गैरवापर करून तुरुंगात डांबले, पण उशिरा का होईना वर्षाखेरीस न्यायालयात या सरकारी मुस्कटदाबीचे थोबाड फुटले. विरोधी पक्षात असलेले सारेच नेते भ्रष्ट आणि तीच मंडळी ईडी वा सीबीआयच्या धाकाने सत्ताधाऱ्यांच्या छावणीत दाखल झाली की, धुऊन-पुसून स्वच्छ, अशी भलतीच व्याख्या सरत्या वर्षात सरकारने रूढ केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे नको तेवढे व्यक्तिस्तोम माजवले जात असतानाच चीनने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीपासून महागाई, बेकारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली अपमानास्पद घसरण, हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच. पुन्हा यावरून प्रश्न विचारेल त्यांना ब्लॅकमेलर्सचा वापर करून तुरुंगात डांबलेच म्हणून समजा. सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले, अशी टीकाही सेनेनं केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.