'धर्मवीर' बोलण्यात वावगं नाही : शरद पवारांच्या वक्तव्यानं अजितदादा तोंडघशी?

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटलं तरी वावगं नाही, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटकारलं आहे. धर्मवीर म्हटलं काय किंवा स्वराज्यरक्षक म्हटलं काय, त्याबाबत वाद नकोत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पवार यांच्या या वक्तव्याने अजित पवार तोंडघशी पडले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.
सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची आज शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नातू पार्थ पवारही उपस्थित होते. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असं विधान अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अधिवेशनात बोलताना केलं होतं. यावरुन सध्या राज्यभर वातावरण तापलं आहे. भाजपने त्यांच्याविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. तसंच पवार यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली जात आहे. याच वादावर आज शरद पवार यांनीही भाष्य केलं.
काय म्हणाले शरद पवार?
“छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा आणि ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा, त्यावरुन वाद नको. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं तरी अयोग्य नाही. धर्मवीर, स्वराज्य रक्षक या दोन्ही उपाधी योग्यच आहेत”
छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराज यांनी राज्याचं रक्षण करण्याचं महत्त्वाचं काम केलं. याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही. जितेंद्र आव्हाडांबाबत प्रश्न विचारला असता “मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नसल्याचं पवार म्हणाले. अजित पवार यांचं वक्तव्य मी टीव्हीवर पाहिलं होतं, म्हणून त्यावर प्रतिक्रिया देत आहे. आता कुणी आमदार बोलत असतील त्या प्रत्येकावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांच्या भूमिकेशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असहमत
अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नसल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. सामना अग्रलेखात म्हटलं की, “अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.
पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, ‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.’ आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही”, असं म्हणत अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलंय.