दौंड (सनी पानसरे ): सुरूवातीला एकही करोना पॉझिटीव्ह रूग्ण नसणारे दौंडचा आज पाचशेचा आकडा पार झाला आहे त्यामुळे दौंडसह ग्रामीण भागात ही चिंतेचे वातावरण पसरले आहे. दौंड शहरासह तालुक्यात कोरोना एवढ्या झपाट्याने वाढला की तो बघता बघता 524 जण कोरोनाबाधित झाले. अर्थात २५८ जणांनी या कोरोनाला आतापर्यंत हरवले. अजूनही निम्मे म्हणजे २५० जण कोरोनाशी लढताहेत. दुर्दैवाने १६ जणांचा कोरोनाने बळी घेतला.
दौंड शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह इतर शासकीय यंत्रणा काम करीत आहे. मात्र तरीही कोरोना संसर्गाची साखळी ही वाढतच चालली आहे. जेवढे रूग्ण उपचार घेवून घरी जात आहेत, तेवढेच रूग्ण कोवीड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. सध्या तालुक्यात रोज नव्या गावांत नवे रूग्ण सापडत आहेत. एकट्या दौंड शहरात 225 रूग्ण झाले आहेत. यामध्ये राज्य राखीव बल गट क्र. 5 व 7 असे दोन्ही गटातील 53 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच शहरातील भारत राखीव पोलीस बल गट क्र.16 मधील 15 जवांनाना कोरोना बाधीत झाले होते. या सर्व जवांनाना मुंबईवरून बंदोबस्तावरून आल्यावर कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर सध्या शहरात शंभर जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 113 अॅक्टीव रूग्ण असून त्यांच्यावर कोवीड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील गल्ली बोळात नव्याने रूग्ण सापडत आहेत. तालुक्यातील ग्रामिण भागातील गावांमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहर व तालुक्यातील रूग्णांची लक्षणीय वाढ लक्षात घेवून दौंड – पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी शहरातील तीन व ग्रामिण भागातील केडगाव येथील एक असे चार खासगी रूग्णालाये अधिकृत घेवून त्याठिकाणी कोवीड सेंटर म्हणून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहीत ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना काही दिवसापुर्वी दिले आहेत. सध्या दौंड शहरात एक व तालुक्याच्या ग्रामिण भागात यवत व स्वामी चिंचोली येथे असे तीन कोवीड सेंटर आहेत. आता हे खासगी चार कोवीड सेंटर झाल्यास तालुक्यात एकूण सात कोवीड सेंटर होईल. मात्र या खासगी रूग्णालयाचे कोवीड सेंटर मध्ये रूपांतरीत केलेल्या रूग्णांचे उपचाराचे पुढील नियोजन कसे असणार आहे. त्यांना या कोवीड सेंटर मध्ये योग्य उपचार मिळतील का ? याबाबत अनेक शंका व प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महात्मा फुले आरोग्यदायक योजनेअंतर्गत जरी रूग्णांना लाभ मिळणार असला तरीही एका रूग्णाचा खासगी रूग्णालयाचा खर्च लाखो रूपयांच्या घरात जात असल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मग या कोवीड सेंटर मध्ये सर्व सामान्य रूग्णांच्या बिलांचा आकडा किती होईल याबाबतही संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.
खासगी रूग्णालायतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची याबाबत काय भूमिका आहे त्यांचेही मत जाणून घेणे गरजेचे आहे. मात्र ते काही असले तरीही दौंड तालुका हा कोरोना मुक्त झाला पाहिजे. आणि ते करण्यासाठी खासगी व शासकीय असा मतभेद न करता, राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षीय नेते , सामाजिक कार्यकत्यांनी एकत्र येवून प्रशासनाला सहकार्य करून योग्य नियोजन करण्याची नितांत आवश्यकता आहे.