थरार ! बिबट्याने पाठीमागून झडप घातली, त्याने प्रतिकार सुरू करत आणखी एक गोष्ट केली, आणि तो थोडक्यात वाचला

अचानक झालेल्या हल्ल्यात प्रकाश अर्जुन बोराडे हे चांगलेच जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
Image Credit source: Google
शैलेश पुरोहित, इगतपुरी ( नाशिक ) : नाशिकच्या इगतपुरी परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे बिबट्याकडून होणारे हल्ले देखील वाढले आहे. विशेषतः लहान मुलांवर होणारे हल्ले मनाला चटका लावून जाणारे ठरत आहेत. अशी सर्व हळहळ व्यक्त करणारी परिस्थिती असतांना शेतात काम करणाऱ्या व्यक्तीवरील बिबट्याने केलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्याचे कारण म्हणजे बिबट आणि संबंधित व्यक्तीमध्ये मोठी झटापट झाली आहे. प्रकाश अर्जुन बोराडे हे शेतात जनावरांना गावत कापण्यासाठी गेले होते. त्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या मागील बाजूलाच बिबट्या दबा धरून बसलेला होता. प्रकाश आपल्या कामात व्यस्त झालेला पाहून बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घातली. त्यात प्रकाश खाली आणि बिबट्यावरुन अशी परिस्थिती होती. पण गवत कापतांना हातातील विळाही खाली पडून गेला होता. त्यामुळे थेट बिबट्यालाच भिडत त्याने जोरात किंचाळी ठोकली. आणि बिबट्याने झटापट करणं सोडून जोरात धूम ठोकली.
अचानक झालेल्या हल्ल्यात प्रकाश अर्जुन बोराडे हे चांगलेच जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
इगतपुरी तालुक्यातील मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणा लगतच्या बाजूलाच हा सर्व प्रकार घडला आहे.
प्रकाश यांच्या ओरडण्याने आजूबाजूला काम करत असलेले कामगारही धावून आले होते, त्यानंतर त्यांनी बिबट्याला पिटाळून लावले होते.
हा सर्व घडलेला पाहून बिबट्याचा वावर अधिक होत असल्याचा प्रकार समोर येत आहे, त्यामध्ये वनविभागाला ही बाब कळविण्यात आली असून पिंजरा लावण्याची मागणी होऊ लागली आहे.
मात्र, प्रकाश बोराडे यांच्यावरील हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी होऊ लागली आहे.