Home » ताज्या बातम्या » प्रभाग रचनेसाठी “तारीख पे तारीख’

प्रभाग रचनेसाठी “तारीख पे तारीख’

प्रभाग-रचनेसाठी-“तारीख-पे-तारीख’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक मुदतीत होणार की पुढे ढकलली जाणार याबाबत रोजच नवनव्या अफवा उठत आहेत. त्यातच आता प्रभाग रचनेवरूनही निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या “तारीख पे तारीख’वरून इच्छुकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. यापूर्वीच्या दोन तारखा हुकल्यानंतर आता सोमवारी (दि. 17) तरी प्रभाग रचनेचे सादरीकरण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत येत्या 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. ऑक्‍टोबर महिन्यापासून निवडणूक आयोगाने प्रभागरचना आणि आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 6 डिसेंबर रोजी कच्चा प्रारुप आराखडा सादर करण्याचे
निर्देश निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले होते. कच्चा आराखडा सादर केल्यानंतर त्यामध्ये काही बदल सुचवित त्रुटी दूर करून नव्याने आराखडा सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले होते. या सादरीकरणासाठी 7 जानेवारी ही तारीख देण्यात आली होती.

मात्र, या तारखेमध्ये अचानक बदल करत 14 जानेवारी ही प्रभागरचनेचा आराखडा सादर करण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. तरीही निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील कर्मचारी करोना बाधित झाल्याने त्यामध्येही बदल करून आता नव्याने 17 जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे. प्रभाग रचनेनंतर आरक्षणाची सोडत काढली जाणार असल्याने इच्छुकांची धावाधाव सुरू आहे. येत्या सोमवारी तरी प्रभाग रचनेचा आराखडा सादर होणार का आणि निवडणूक आयोग मान्य करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वपक्षीयांमध्ये शांतता
इच्छुकांमध्ये धावपळ सुरू झाली असली तरी शहरातील प्रमुख पक्षांनी मात्र महापालिका निवडणुकीची तयारी अद्याप सुरू केलेली दिसून येत नाही. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मनसेकडून शहर पातळीवर कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने अद्यापतरी सर्वत्र शांतता पहावयास मिळत आहे. जाहीर पातळीवर भाजपाकडून कोणतेही आदेश दिले गेले नसले तरी अंतर्गत स्तरावर मिशन 100 प्लससाठी तयारी चालविल्याचे सांगण्यात येत आहे.

वेळेबाबत साशंकता
प्रभाग रचनेवरून सुरू असलेल्या “तारीख पे तारीख’ दरम्यानच आता करोनाच्या तिसऱ्या लाटेनेही जोरदार शिरकाव केल्यामुळे निवडणुकांच्या वेळेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. महापालिकेची मुदत संपण्यास आता केवळ 56 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाही प्रभागरचनाच पूर्ण न झाल्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढे ढकलली जाण्याचीच शक्‍यता निर्माण झाली आहे.

वाढते करोनाचे रुग्ण आणि अल्प कालावधी यामुळे निवडणूका पुढे जाण्याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये करोनाची लाट कायम राहण्याची शक्‍यता आणि त्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा यामुळे महापालिकेची निवडणूक किमान दोन महिने पुढे जाईल, अशी चर्चा रंगली आहे. निवडणूक पुढे ढकलली गेल्यास पालिकेचा कारभार पहिल्यांदाच प्रशासक या नात्याने आयुक्तांकडे जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.