Home » ताज्या बातम्या » रौप्यपदक विजेत्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन; म्हणाले…

रौप्यपदक विजेत्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन; म्हणाले…

रौप्यपदक-विजेत्या-वेटलिफ्टर-मीराबाई-चानू-यांना-पंतप्रधान-नरेंद्र-मोदींचा-फोन;-म्हणाले…

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात भारतासाठी गोड ठरली आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी महिला वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात देशाला रौप्यपदक आणि स्पर्धेतील पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून दिलं आहे. चानू यांच्या यशाबाबत देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून त्यांना शाबासकी दिली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबाबत मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.” अशी माहिती पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी लिहतात, “भारताची टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील सुरुवात उत्तम झाली. मीराबाई चानू यांच्या विलक्षण कामगिरीमुळे संपूर्ण भारत देश आनंदोत्सव साजरा करतोय. वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी रौप्यपदक पटकावल्याबाबत त्यांचे अभिनंदन. त्यांचे हे यश प्रत्येक भारतीयांसाठी स्फुर्तीदायक आहे.”

दरम्यान, वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी महिला वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात  रौप्यपदक पटकावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने पदक विजेत्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांसाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. याद्वारे सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकास १२.५ लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूच्या प्रशिक्षकास १० लाख तर कांस्य पदक विजेत्या खेळाडूच्या प्रशिक्षकास ७.५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *