Home » Uncategorized » Pune : म्हणे…स्टेशनरी नसल्याने गुणपत्रिका छापल्या नाहीत!

Pune : म्हणे…स्टेशनरी नसल्याने गुणपत्रिका छापल्या नाहीत!

pune-:-म्हणे…स्टेशनरी-नसल्याने-गुणपत्रिका-छापल्या-नाहीत!

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर केला. त्याच्या अडीच महिन्यांनंतरही हजारो विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेली नाही. पुणे विद्यापीठाकडे स्टेशनरी उपलब्ध नसल्याने गुणपत्रिकांची छपाईच होऊ शकली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्‍त होत आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सर्व पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिकासह सर्व प्रमाणपत्रे आऊटसोर्सिंग न करता स्वत:च छपाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोट्यवधी रुपयाची बचत होत असून, सर्व डाटाही विद्यापीठकडे उपलब्ध होत आहे. या सर्व प्रमाणपत्राच्या छपाई करण्यासाठी लागणारी स्टेशनरी निविदा काढून खरेदी केली जाते. विद्यापीठाला जवळपास सुमारे दहा लाख गुणपत्रिकांची छपाई करावी लागते. यंदा मात्र निविदा काढून कागद खरेदी करण्याच्या प्रक्रियेस विलंब झाल्याचे दिसून येत आहे.

तथापि, छपाईसाठी कागदसह अन्य स्टेशनरी उपलब्ध नसल्याचे सर्व विद्यार्थ्यांची गुणपत्रिका छापणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडीच महिन्यांनंतरही गुणपत्रिका प्राप्त होत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. विद्यापीठाकडून अन्य कामांसाठी तत्परता दाखविली जाते. मात्र, परीक्षा विभागाच्या कामासाठी इतकी दिरंगाई का, असा प्रश्‍न उपस्थित विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची छपाई करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होणार आहे. स्टेशनरी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास काहीसा विलंब झाला.
– डॉ. महेश काकडे,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published.