Home » Uncategorized » भारतात अद्याप ओमिक्रोनचा शिरकाव नाही

भारतात अद्याप ओमिक्रोनचा शिरकाव नाही

भारतात-अद्याप-ओमिक्रोनचा-शिरकाव-नाही

नवी दिल्ली- दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमिक्रोन या करोनाच्या नवीन विषाणूचा अद्याप भारतात शिरकाव झालेला नाही, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी आज सांगितले. बी.1.1.529 किंवा ओमिक्रोन विषाणू सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्या आठवड्यातच सापडला आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

भारतात अद्याप ओमिक्रोन विषाणूची लागण झालेले एकही प्रकरण सापडलेले नाही. कोविडसंदर्भात नियुक्‍त केलेल्या तज्ज्ञांच्या गटाकडून या विषाणूच्या संसर्गाबाबत बारकाईने लक्ष दिले जाते आहे. देशात परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांच्या गुणसूत्रांच्या विश्‍लेषणाकडे बारकाईने लक्ष दिले जाते आहे.

ओमिक्रोन विषाणू अधिक घातक आहे, अशी माहिती पुढे येताच अनेक देशांमधून या संदर्भात खबरदारीची पावले उचलली जाऊ लागली आहेत. या पार्श्‍वभुमीवर केंद्र सरकारने धोकादायक देशांमधून प्रवास केलेल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा प्रवाशांच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबतही आता आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर, हॉंगकॉंग आणि इस्रायल हे देश धोकादायक देश म्हणून समजले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.