Home » Uncategorized » “वाढलेल्या वजनामुळे उघडपणे माझी टिंगल व्हायची…’; अपूर्वाने सांगितलं मालिका सोडण्यामागचं मुख्य कारण

“वाढलेल्या वजनामुळे उघडपणे माझी टिंगल व्हायची…’; अपूर्वाने सांगितलं मालिका सोडण्यामागचं मुख्य कारण

“वाढलेल्या-वजनामुळे-उघडपणे-माझी-टिंगल-व्हायची…’;-अपूर्वाने-सांगितलं-मालिका-सोडण्यामागचं-मुख्य-कारण

मुंबई – झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरांत पहिली जाती. या मालिकेत बऱ्याच घडामोडी होतच असतात. मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना समोर येत असतात. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं.

या मालिकेतील अण्णा, शेवंता, माई, पांडू, सुसल्या ही पात्र देखील खूपच लोकप्रिय झाली. कोकणी माणसाचे चपखल वर्णन या मालिकेत दाखवले असल्याने प्रेक्षकांना ही पात्रे आपली वाटली. मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताची जोडीवर तर संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम केले. 

मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘अपूर्वा नेमळेकर’ने आता या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. शेवंता फेम अपूर्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. परंतु आता अपूर्वाची जागा ‘कृतिका तुळस्कर’ या अभिनेत्री घेतली आहे.

अपूर्वाने अचानक मालिकेतून काढता पाय घेतल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. परंतु आपण ही मालिका का सोडली याबाबत अपूर्वाने सोशल मीडियावर खुलासा केला आहे. यासंदर्भातील एक भली मोठी पोस्ट सुद्धा तिने शेअर केली आहे.

काय म्हणाली अपूर्वा….

शेवंता म्हणून, आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला हि भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले. खरं सांगायचं तर “शेवंता चे सादरीकरण हे मला सहज जमत गेले, जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिके मधले नाविन्य, त्या व्यक्ती रेखेतील विविध पैलू, निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकां मध्ये “शेवंता” हि अजरामर झाली. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली.

असे सर्व काही छान घडत असताना, आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल, की मी “शेवंता” च्या भूमिकेचा का त्याग केला. असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कर्मेटमार्फत, ईमेल्स मधून प्रेक्षकांनी या बद्दल विचारना केली. त्यांच उत्तर देणं हीं माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि या गोष्टीचा उलगडा करणे हें माझं कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे.

शेवंता या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कॉमेंट, आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही जेष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अश्या जाणीवपूर्वक वारंवार केले गेल्या. त्याबद्दल वरिष्ठानी त्यावर कारवाई केल्यानंतरहीं, संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही.

तुम्हाला माहितीच आहे की RKC चं शूटिंग हे सावंतवाडीत चालु . आहे. मी मुंबईवरून 12 तासाचा ट्रेन नं प्रवास करुन जात होते. मला शूटिंग करता बोलावल्यानंतर फक्त एकच दिवस शूट करुन नंतर 3-4 दिवस काहीच शूट केल जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ 6 ते 7 दिवसच काम लागत होतं. आणि त्याकरिता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.

production हाऊस कडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्यां सीजन साठी तुमचे आम्हाला 5 ते 6 दिवसच लागणार आहेत म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेल कडून मला आणखी एक शो देण्याच आश्वासन दिलं गेल. परंतु 5 ते 6 महिने झाले अध्याप ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे माझं आर्थिक नुकसान होत आहे.

असाच प्रकार गेल्या वर्षी सुद्धा झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेल कडून एकही पैसा बुडणार नाही. असं आश्वासन दिलं गेलं होतं. अध्याप पर्यत तो चेक मिळाला नाही आणि ते सुद्धा आश्वासन पाळलं गेलं नाही.

मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळतं नसेल. आणि माझ्या प्रामाणिक कष्टाची, अवहेलना जिथं होतं असेल.. आणि नवख्या कलाकाराकडून अपमास्पद वागणूक मिळतं असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी या शो मध्ये नं राहण्याचा निर्णय घेतला.

या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंता तून मला बाहेर पडावे लागले दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयत्तिक निर्णय आहे. आयुष इथेच थांबले नाही, आणखीन काही नवीन रोल्स, मी करत राहीन. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील अशी मी आशा करते. हीच माझी एकमेव प्रेरणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *