Home » Uncategorized » अमरिंदर सिंग बंडाच्या पवित्र्यात?

अमरिंदर सिंग बंडाच्या पवित्र्यात?

अमरिंदर-सिंग-बंडाच्या-पवित्र्यात?

चंडीगढ –पंजाबचे मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर आक्रमक झालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग आता थेट बंडाच्या मूडमध्ये दिसत आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा इरादा व्यक्त केला.

तसेच, कॉंग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांचा उल्लेख अननुभवी म्हणून केला.
अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील दुरावा मागील काही काळात वाढला. त्यातून पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपाला गेल्याने अमरिंदर यांना नुकतेच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले.

त्यामुळे दुखावलेल्या अमरिंदर यांनी सिद्धू यांच्याविरोधात जणू राजकीय युद्ध छेडले आहे. त्यातून बुधवारी अमरिंदर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका मांडली. सिद्धू यांना कुठल्याही स्थितीत मुख्यमंत्रिपदी बढती मिळू देणार नाही. निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी मी उमेदवार देईन.

सिद्धू यांच्यासारख्या धोकादायक व्यक्तीपासून देशाला वाचवण्यासाठी कुठलाही त्याग करण्याची माझी तयारी आहे, असे त्यांनी म्हटले. काहीशा सौम्य शब्दांत त्यांनी राहुल आणि प्रियांका यांच्यावरही निशाणा साधला. ते मला मुलांसारखे आहेत. ते अननुभवी आहेत. त्यांचे सल्लागार त्यांची दिशाभूल करत आहेत, असे अमरिंदर यांनी म्हटले.

पंजाबमधील विधानसभा निवडणूक अवघ्या चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात त्या राज्यातील पक्षांतर्गत घडामोडी सत्तारूढ कॉंग्रेसपुढील आव्हाने वाढवणाऱ्या ठरण्याची चिन्हे आहेत.

1 thought on “अमरिंदर सिंग बंडाच्या पवित्र्यात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *