Home » Uncategorized » घाऊक महागाई गेली 11.39 टक्‍क्‍यावर; किरकोळ महागाई वाढण्याची शक्यता

घाऊक महागाई गेली 11.39 टक्‍क्‍यावर; किरकोळ महागाई वाढण्याची शक्यता

घाऊक-महागाई-गेली-11.39-टक्‍क्‍यावर;-किरकोळ-महागाई-वाढण्याची-शक्यता

नवी दिल्ली – पेट्रोल व डिझेलचे दर उच्च पातळीवर कायम आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढत आहे. परिणामी ऑगस्ट महिन्यातील घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर 11.39 टक्‍क्‍यावर गेला आहे. गेल्या पाच महिन्यापासून या महागाईचा दर दहा टक्‍क्‍यांच्या वर आहे. त्यामुळे आगामी काळात किरकोळ महागाई वाढण्याची शक्‍यता वाढली आहे. तसे झाले तर रिझर्व बॅंकेला व्याजदरात वाढ करावी लागणार आहे.

अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या असतानाच इंधनाच्या किमती वाढल्यामुळे इतर वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. जुलै महिन्यामध्ये घाऊक महागाईचा दर 11.16 टक्के होता. तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये या महागाईचा दर केवळ 0.41 टक्के टक्के होता. इंधनाबरोबरच नैसर्गिक वायू, उत्पादित वस्तू, धातू, कापड, रसायने इत्यादीच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही आकडेवारी जारी करताना सांगितले.

एकीकडे अन्नधान्य आणि खाद्यपदार्थाच्या वस्तूंच्या किमती कमी होत असतानाच इतर वस्तूंच्या किमती मात्र वाढत आहेत. पेट्रोलियम पदार्थाच्या किमती 40 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. कालच किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी झाल्याचे आकडेवारी जाहीर झाली होती. मात्र आता घाऊक किमतीवरील महगाईची आकडेवारी वाढली असल्यामुळे आगामी काळात किरकोळ किमतीवरील महागाई वाढण्याची शक्‍यता आहे.

ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत या महागाईचा टक्का आणखी वाढण्याची शक्‍यता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. ऑक्‍टोबर महिन्यानंतर मात्र ही महागाई कमी होऊ लागेल. या महागाईला मुख्यतः इंधनाच्या किमती कारणीभूत आहेत. त्यामुळे इंधनाच्या किमती कमी करण्याची आवश्‍यकता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकार यावरील कर वाढवीत असल्यामुळे इंधनाचे दर सध्या विक्रमी पातळीवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *