Home » ताज्या बातम्या » दिल्ली वार्ता : घडतंय बिघडतंय

दिल्ली वार्ता : घडतंय बिघडतंय

दिल्ली-वार्ता-:-घडतंय-बिघडतंय

– वंदना बर्वे

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डावपेचापुढे विरोधक खरंच टिकाव धरणार काय?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या कमानीत सरकारच्या विरोधात अनेक टोकदार मुद्दे आहेत; परंतु विरोधक एकजूट नाहीत. अशात, सरकारला धारेवर धरण्याची विरोधकांची योजना खरंच यशस्वी होणार काय? हा खरा प्रश्‍न आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचे व्यवस्थापन करताना सरकारला धाप लागली होती. औषधांची टंचाई आणि काळाबाजार, ऑक्‍सिजनचा अभाव, मृतकांची वाढती संख्या, मायनस जीडीपी, पेट्रोल-डीझेलची दरवाढ असे मुद्दे विरोधकांच्या कमानीत आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारला धारेवर धरण्यासाठी रविवारी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावून चर्चा केली. याचा किती परिणाम संसदेत बघायला मिळतो हे अधिवेशनात कळेलच!

सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेसला लवकरच नवीन अध्यक्ष आणि राजकीय सल्लागार मिळणार असल्याची चर्चा 24 अकबर रोडवरील मुख्यालयात रंगली आहे. कॉंग्रेस महासचिव आणि यूपीच्या प्रभारी प्रियांका गांधी-वढेरा यासाठी सर्व सूत्रं हलवीत असल्याचे ऐकिवात आहे. कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी वर्षानुवर्षांपर्यंत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले होते. मात्र, अलीकडेच त्यांचे निधन झाले. कॉंग्रेसच्या ट्रबलशूटरची भूमिका सध्या प्रियांका गांधी या बजावत आहेत. केवळ संकटमोचकची नव्हे, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या राजकीय सल्लागाराची भूमिका बजावत आहेत. आई आणि बंधू यांच्याकडून जे निर्णय सध्या घेतले जात आहेत त्यात प्रियांका गांधी यांचा वाटा असतो. उदाहरण द्यायचे झाले तर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे देता येईल. कमलनाथ दिल्लीत सक्रिय भूमिका बजावण्यासाठी तयार झाले आहेत. त्यामागे प्रियांका यांचेच डोकं आहे. कमलनाथ यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढे केले जाणार असल्याचे समजते.

सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि कमलनाथ यांची एक बैठकही पार पडली. महत्त्वाची म्हणजे, कमलनाथ यांच्यासाठी ही संधी चालून आली आहे. कारण, त्यांनाही मध्य प्रदेशमधून बाहेर पडायचे आहे. कमलनाथ यांनी अलीकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजपविरुद्ध राष्ट्रीय आघाडी उभी करण्यासाठी पवार यांनी घरी बोलाविलेल्या बैठकीनंतर ही बैठक झाली होती. येत्या सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये कॉंग्रेसचे अधिवेशन होणे आहे. यात कमलनाथ यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

पंजाबचा वाद सोडविण्याची जबाबदारी कॉंग्रेसने निवडणुकीचे धोरण आखणारे प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर टाकली असल्याचे समजते. अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्ध यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात गांधी कुटुंबाशी चर्चासुद्धा केली आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशसह उत्तराखंड आणि पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. यात कॉंग्रेसच्या निवडणुकीचे मॅनेजमेंट प्रशांत किशोर करणार अशी चर्चा आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दंड थोपटणाऱ्या जी-23 गटाचे प्रमुख गुलाम नबी आझाद पुन्हा राज्यसभेत येणार असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसचे आझाद आणि आनंद शर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ अलीकडेच संपला होता. यानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर आपली वर्णी लागेल, अशी आशा दोन्ही नेत्यांना होती. मात्र, राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेवर पाठविले आणि कॉंग्रेसच्या नेतेपदाची जबाबदारी टाकली. यानंतर कॉंग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्याची शक्‍यता मावळली होती. परंतु, गुलाम नबी आझाद डीएमकेच्या मदतीने ज्येष्ठ सभागृहात जाणार असल्याची चर्चा आहे.

तमिळनाडूचे अण्णाद्रमुकचे खासदार ए. मोहम्मद जान यांच्या निधनामुळे राज्यसभेची एक जागा रिक्‍त झाली आहे. या जागेसाठी आझाद आणि एम. के. स्टॅलिन यांच्यात समझोता झाला असे म्हणतात. आझाद आणि द्रमुक नेते दिवंगत एम. करुणानिधी चांगले मित्र होते. आझाद नेहमीच त्यांना भेटण्यासाठी तमिळनाडूला जायचे. उभय नेत्यांच्या बैठकीला स्टॅलिनही उपस्थित असायचे आणि वडिलांच्या सांगण्यावरून आझाद यांना सोडायला विमानतळावरही जायचे. मजेची बाब अशी की, तमिळनाडूच्या विधानसभेत कॉंग्रेसचे फक्‍त 18 आमदार आहेत. या हिशेबाने कॉंग्रेसला राज्यसभेची जागा मिळण्याची सूतराम शक्‍यता नाही. मात्र, वडिलांची मैत्री निभाविण्यासाठी स्टॅलिन आझाद यांना राज्यसभेवर पाठवू शकतात. स्टॅलिन अलीकडेच दिल्लीला आले होते तेव्हा त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि या मुद्द्यावर चर्चा केली.

कॉंग्रेसमध्येच एक गट असा आहे जो आझाद यांच्या विरोधात आहे. आझाद यांना राज्यसभेवर पाठविण्याऐवजी प्रवीण चक्रवर्ती यांची शिफारस करीत आहे. चक्रवती डाटा विश्‍लेषक म्हणून काम पाहतात. यामुळे राज्यसभेच्या जागेवरून कॉंग्रेसमध्येच ओढताण सुरू झाली आहे. अंतिम निर्णय स्टॅलिन यांना घ्यायचा आहे. परंतु, या वादावर तोडगा निघाला नाही तर कॉंग्रेस पक्ष राज्यसभेची हाती आलेली आयती एक सिट गमावून बसेल, यात संशय नाही.
ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता त्याचवेळेस राहुल गांधी दिल्लीत नेत्यांसोबत चर्चा करीत होते. राहुल गांधी यांनी बैठकीत स्पष्ट संदेश दिला की, कॉंग्रेस आता त्या राज्यांवर जास्त फोकस करणार ज्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा जास्त निवडून येतात.

थोडक्‍यात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांवर फोकस करण्याची इच्छा दर्शविली आहे. राहुल यांच्या मते, महाराष्ट्रात कॉंग्रेसचा पाया मजबूत आहे. परंतु, कॉंग्रेसचे नेते आपल्याच विश्‍वात मग्न आहेत. महाराष्ट्रात येत्या काळात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणे आहे. या निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्या अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे; परंतु अलीकडेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा बोलल्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. कर्नाटकचे नेते एच. के. पाटील सध्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. त्यांच्याऐवजी एखाद्या दमदार नेत्याला राज्याचे प्रभारी बनवावे, अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे. यासाठी तारिक अन्वर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ते आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. अशात, त्यांच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकणेसुद्धा थोडे अवघड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.