Home » ताज्या बातम्या » आमदार मोहिते यांनी पात्रता तपासावी ; माजी खासदार आढळराव पाटलांचे प्रत्युत्तर

आमदार मोहिते यांनी पात्रता तपासावी ; माजी खासदार आढळराव पाटलांचे प्रत्युत्तर

आमदार-मोहिते-यांनी-पात्रता-तपासावी-;-माजी-खासदार-आढळराव-पाटलांचे-प्रत्युत्तर

राजगुरूनगर – खेडच्या आमदारांची आमदारकी ही लोकांची कामे करण्यासाठी नसून फक्‍त माझ्यावर टीका करण्यापूरती आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांना खेळ घालण्यापुरती आणि स्वतःच्याच पक्षातील लोकांचे राजकीय खच्चीकरण करण्यापुरती मर्यादित आहे.

आमदार म्हणून त्यांचे तालुक्‍यात आजपर्यंत कुठलेही मोठे योगदान नाही. फॉर्म बाद झालेल्या बाजार समितीचे ठेकेदार असलेल्या मोहितेंनी माझ्यावर खोटे आरोप करण्यापूर्वी आपली पात्रता तपासावी असा सल्ला, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते यांना दिला.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारेच सडेतोड उत्तर दिले आहे. आढळराव म्हणाले की, खेडचे हे आमदार स्वतःच निष्क्रिय आहे. खेड तालुक्‍यातील लोकांसाठी 15 वर्षे सत्तेतला आमदार असूनही या आमदारांना इथे ना विमानतळ करता आले, ना लोकांसाठी एखाद मोठ हॉस्पिटल उभारता आले, ना तालुक्‍यात कोणता मोठा प्रकल्प आणता आला.

15 वर्षांत खेड तालुक्‍याची प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न का केले नाही? स्वतःचा निष्क्रियपणा झाकण्यासाठीच त्यांनी मी व तत्कालीन आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या माध्यमातून जानेवारी 2019 ला मंजुरी मिळालेल्या पंचायत समितीच्या कामाला तब्बल 3 वर्षे खीळ घातली. एव्हाना ही इमारत पूर्ण होऊन नागरिकांसाठी इमारतीचा वापरही आतापर्यंत सुरू झाला असता.

एमआयडीसीतील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्‍न सातत्याने मी सोडवले, पण एमआयडीसीत गुंडगिरी करून ठेकेदारी आमदारांनी केली. त्यामुळेच येथील लोकांना मी आंबेगावचा असूनही आपला वाटत असल्यानेच आजवर मला भरभरून साथ दिली. मात्र तुम्ही खेडचे असूनही शेतकऱ्यांसाठी शासना दरबारी आवाज उठवण्याऐवजी एमआयडीसीत ठेके टाकले, गुंडगिरीला प्रोत्साहन दिले, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, संचालक असताना बाजार समितीचे ठेके घेत भ्रष्टाचार केला, वाळूचे अवैध धंदे केले.

एमआयडीसीतील उद्योगपतीचे अपहरण व उद्योजकांकडे खंडणी मागून त्यांना दमबाजी केल्याच्या आपल्या तक्रारी नवी दिल्ली येथे आपले नेते शरद पवार साहेब यांच्याकडे अनेक उद्योजकांनी भेटून केल्या होत्या, त्याचा मी साक्षीदार आहे. बाजार समितीतील भ्रष्टाचार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून त्याच्या मुळाशी जाऊन सर्व पाळेमुळे आम्ही खणून काढणार आहोत.

एजंटांमार्फत कोट्यवधींची माया कमवली
खेड तालुक्‍यातील लोकांच्या भूसंपादनाच्या अडचणी प्रशासनासमोर सातत्याने मांडल्या, भामा आसखेड व सेझमधील शेतकऱ्यांच्या जमिनी व परतावे मिळण्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या मी झिजवल्या; मात्र आमदारकीचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करत आपल्या एजंटांमार्फत गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेऊन त्यांची खरेदी विक्री करून कोट्यवधींची माया कमावली.

शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकार काय?
राजगुरूनगर -दिलीप मोहिते यांना शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकारच काय? महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री कामे करत नाहीत असे सांगून राष्ट्रवादी पक्षाचा आदेश झुगारून पक्षावर दबावतंत्र वापरून राज्यसभा व विधान परिषदेला पक्षविरोधी भूमिका यांनी घेतली. 2014 मध्ये देखील राष्ट्रवादीने सुरेश गोरे यांना तिकीट फायनल केल्यावर यांनी पक्षविरोधात उघड बंड पुकारून पक्षालाच ब्लॅकमेल केले व स्वतःसाठी तिकीट मिळवले. पंचायत समितीचे श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून शिवसेनेचेच पंचायत समिती सदस्य पैशाचे आमिष दाखवून वेळप्रसंगी दमदाटी करून फोडले. शिवसेनेबद्दल तुम्हाला एवढा पुळका होता तर मग सभापती राष्ट्रवादीचा का केला, असा सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते यांना केला आहे.

आमदार मोहितेंनी स्वतःच्या पक्षातील मातब्बर उमेदवारांनी भविष्यात आमदारकी मागू नये म्हणून त्यांचे जिल्हा परिषद निवडणुकीतच तिकीट कापून सोयीस्कर खच्चीकरण केले. माजी आमदार साहेबराव सातकर यांच्या मुलाला पिडीसी बॅंकेवर घेण्याचा शब्द दिला, नंतर त्यांना बाजूला सारून स्वतःच पीडीसी बॅंकेवर संचालक झाले. दरम्यान, आज मी लोकप्रतिनिधी नसतानाही विकासकामांवर बोलण्याऐवजी माझ्यावर टीका करूनच स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्याची आमदार मोहितेंना केविलवाणी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय व खेड तालुक्‍याच्या इतिहासातील सर्वाधिक कलंकीत आमदारांना घरी बसवल्याशिवाय इथली जनता आता स्वस्थ बसणार नाही, असे आढळराव यांनी नमूद केले.

मोहितेंच्या बुद्धीची कीव येतेय
खेडच्या आमदारांना आज अचानकच मी आंबेगावचा असल्याचा साक्षात्कार झालाय. मी 2004 ला निवडून आलो तेव्हाही आंबेगावचाच रहिवासी होतो. आमदार एका तालुक्‍याचा असतो, खासदार सहा तालुक्‍यांचा असतो इतकी साधी बाब माहित नसलेल्या माणसाच्या बुद्धीची कीव येते. उद्या हे लहरी बाबा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बारामतीचे होते म्हणून त्यांनी विमानतळ खेडऐवजी बारामतीला हलवले असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटायला नको, असे सांगून माजी खासदार आढळराव पाटील यांनी दिलीप मोहितेंचा खरपूस समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.