Home » ताज्या बातम्या » विद्यार्थी वाहतुकीबाबत पुणे आरटीओ खरंच गंभीर आहे का ?

विद्यार्थी वाहतुकीबाबत पुणे आरटीओ खरंच गंभीर आहे का ?

विद्यार्थी-वाहतुकीबाबत-पुणे-आरटीओ-खरंच-गंभीर-आहे-का-?

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – एंजल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली. पण, या वाहनाची “स्कूल बस’ म्हणून आरटीओकडे नोंदणीच नसल्याचे समोर आले आहे. तर, काही दिवसांपूर्वी कात्रज-कोंढवा रस्त्यावर अशाच एका बसला आग लागली होती. या घटना पाहता विद्यार्थी वाहतुकीबाबत आरटीओ गंभीर आहे का? असा प्रश्‍न विचाराला जात आहे.

हडपसर परिसरात एंजल हायस्कूलच्या आवारात थांबलेल्या या बसला मंगळवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्‍यात आणली. त्या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आणि प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. मंगळवारी मोहर्रमनिमित्त शाळेला सुट्टी होती. त्यामुळे ती बस शाळेसमोरच होती. पण, जर विद्यार्थ्यांची वाहतूक करताना अशी घटना घडली असती, तर..? या विचारांनी आता पालकवर्ग भीतीपोटी वावरत आहे.

आग लागलेल्या बसमधून विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचे अधिकाऱ्यांना माहिती नव्हते. पण, स्थानिक नागरिक व शाळा अधिकाऱ्यांनी या बसमधून विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. याबस बरोबरच आणखी काही बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. पण, त्यांचीही आरटीओकडे नोंदणी नसल्याचे समोर आले आहे.

सगळं काही तात्पुरतच…
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसची फिटनेस चाचणी करून आरटीओकडून प्रमाणपत्र दिले जाते. मोटार वाहन कायद्यानुसार शालेय वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आवश्‍यक असते. पण, बऱ्याच बसमध्ये ही यंत्रणाच नसते. केवळ योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ते इतर बसमधून काही काळासाठी ठेवले जाते. एकदा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते काढले जाते. त्यामुळे आरटीओने या वाहनांची नियमित तपासणी करून यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

घटनास्थळी आरटीओचे वायुवेग पथक पाठवण्यात आले आहे. बसची फिटनेस तपासणी झाली आहे की नाही, शालेय वाहतुकीचा परवाना आहे की नाही, यासारख्या कायद्यांतील सर्व नियमांची तपासणी मोटर वाहन निरीक्षक करतील. त्यानंतर संबंधित वाहन मालकावर कारवाई करण्यात येईल.
– डॉ. अजित शिंदे, आरटीओ, पुणे

आग लागलेली ही गाडी एंजल मिकी मिनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची होती. या बस प्रायव्हेट ठेकेदाराच्या आहेत, शाळेचा यांच्याशी करार झालेला आहे, अशा एकूण सहा बसमार्फत विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. मंगळवारी सुट्टी असल्यामुळे ही बस शाळेत लावण्यात आली होती.
– पंकज भारती, एंजल मिकी मिनी शाळा, हडपसर.

हडपसर येथील शाळेत लावलेली बस आमच्या रेकॉर्डनुसार शालेय वाहतुकीसाठीची नव्हती. त्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही वायुवेग पथक पाठवले होते. मात्र, या बसमधून विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.
– संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published.