Home » ताज्या बातम्या » #CWG2022 #Cricket : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाने सुवर्णपदक हुकले, भारतीय महिला संघाला अखेर….

#CWG2022 #Cricket : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाने सुवर्णपदक हुकले, भारतीय महिला संघाला अखेर….

#cwg2022-#cricket-:-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या-पराभवाने-सुवर्णपदक-हुकले,-भारतीय-महिला-संघाला-अखेर….

बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी केलेल्या महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला रजतपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 9 धावांनी पराभव पत्करावा लागला.

यापूर्वी 1998 साली पुरुषांच्या क्रिकेटचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय संघाला पदक जिंकता आले नव्हते. त्यानंतर यंदाच्या वर्षीपर्यंत क्रिकेटचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला नाही. त्या स्पर्धेतही ऑस्ट्रेलिया संघानेच सुवर्णपदक पटकावले होते.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 162 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 152 धावांवरच संपुष्टात आला व ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 धावांनी जिंकत सुवर्णपदकावरही नाव कोरले. भारतीय संघाला रजतपदकावरच समाधान मानावे लागले.

A tight finish in the end and Australia beat India by 9 runs in the final of the Commonwealth Games.#TeamIndia get the SILVER medal 🥈 pic.twitter.com/s7VezmPhLI

— BCCI Women (@BCCIWomen) August 7, 2022

या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. स्टार फलंदाज स्मृती मानधनासह शफाली वर्मा, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी साफ निराशा केली. मात्र, जेमिमा रॉड्रीक्‍स व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी करत डाव सावरला. जेमिमा 33 धावांवर बाद झाली. हरमनप्रीतने आक्रमक 65 धावांची खेळी केली. मात्र, तिला तळातील फलंदाजांनी साथ दिली नाही. हा सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात भारताला 11 धावा करण्याचे लक्ष्य होते. मात्र, त्यात अपयश आल्याने संघाला सामना गमवावा लागला.

त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 161 धावा केल्या. त्यांच्याकडून बेथ मुनीने 61 धावा केल्या. मुनीने मेघ लेनिंगसह दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. कर्णधार लेनिंग 36 धावांवर बाद झाली. अष्टपैलू ऍश्‍ले गार्डनरने 25 धावा केल्या. रशेल हेन्सने नाबाद 18 धावांची खेळी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. भारताकडून स्नेह राणा व रेणुका सिंगने प्रत्येकी 2 बळी घेतले. दीप्ती शर्मा व राधा यादवने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

गांगुलीकडून अभिनंदन…

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रजतपदक विजेत्या भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. भारतीय महिला संघाने सुवर्णपदक मिळवले नसले तरीही त्यांची गुणवत्ता कुठेही कमी पडली नाही. त्यांनी मिळवलेल्या रजतपदकाने देशवासियांनाही अभिमान वाटला आहे, असे गांगुली यांनी ट्‌विट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.