Home » ताज्या बातम्या » उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचा आज निरोप समारंभ; पंतप्रधान म्हणाले,”कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं”

उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचा आज निरोप समारंभ; पंतप्रधान म्हणाले,”कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं”

उपराष्ट्रपती-एम.व्यंकय्या-नायडू-यांचा-आज-निरोप-समारंभ;-पंतप्रधान-म्हणाले,”कोणतंही-काम-नायडूंसाठी-ओझं-नव्हतं”

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांचा आज निरोप समारंभ आहे. यानिमित्त राज्यसभेत  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोपाचे भाषण केले.यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत, “मी व्यंकय्या नायडूंना अनेक भूमिकांमध्ये पाहिले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांच्यासोबत काम करताना व्यंकय्या नायडू यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही पाहिले आहे. त्यांनी प्रत्येक जबाबदारी मोठ्या समर्पणाने पार पाडली आहे. कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं. तरुणांनी नायडू यांच्याकडून कौशल्य शिकलं पाहिजे”, अशा शब्दात नायडूंचा गौरव केला आहे.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, आपण यावेळी असा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत, जेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती आणि पंतप्रधान हे सर्व लोक स्वतंत्र भारतात जन्मलेले आहेत. आणि हे सर्व अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या परिवारातून आलेले आहेत. मला वाटते त्याचे प्रतीकात्मक महत्त्व आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आज आम्ही सर्वजण राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांचे आभार मानण्यासाठी उपस्थित आहोत. या सभागृहासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. सभागृहातील अनेक ऐतिहासिक क्षण तुमच्याशी फार आत्मीयतेनं जुळलेले आहेत, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ‘मी राजकारणातून निवृत्त झालो आहे, पण सार्वजनिक जीवनातून नाही’, असे तुम्ही अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे, या सभागृहाचे नेतृत्व करण्याची तुमची जबाबदारी आता संपत आहे, परंतु राष्ट्र तसेच सार्वजनिक जीवनातील कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्यांना तुमच्या अनुभवांचे मार्गदर्शन मिळत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

तसेच नायडूंविषयी मोदी म्हणाले की, वैयक्तिकरित्या मी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जवळून पाहिले हे माझे भाग्य आहे. त्यातल्या काही भूमिकांमध्ये तुमच्यासोबत काम करण्याचे भाग्यही मला लाभले. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुमची वैचारिक बांधिलकी असो, आमदार म्हणून तुमचे काम असो, खासदार म्हणून सभागृहातील तुमची कामे असोत, पक्षप्रमुख म्हणून तुमचे नेतृत्व, मंत्रिमंडळातील तुमची मेहनत, किंवा राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती म्हणून तुमचं काम असो, सर्व पातळ्यांवर तुम्ही उत्तम आणि निष्ठेने काम केलं आहे, असं मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.