Home » ताज्या बातम्या » पाकिस्तानधून आलेल्या गीताला मिळाला परिवार, खरे नाव राधा; जाणून घ्या, पूर्ण कहानी

पाकिस्तानधून आलेल्या गीताला मिळाला परिवार, खरे नाव राधा; जाणून घ्या, पूर्ण कहानी

पाकिस्तानधून-आलेल्या-गीताला-मिळाला-परिवार,-खरे-नाव-राधा;-जाणून-घ्या,-पूर्ण-कहानी

भोपाल, 28 जून : 2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात आलेल्या गीताला (Geeta from Pakistan) तिचे खरे कुटुंब सापडले आहे. गीता ही मूळची महाराष्ट्रातील परभणीची (Parbhani) असून तिचे खरे नाव राधा आहे. तिच्या परिवारात तिची आई मीना पंडारे आणि विवाहित बहीण पूजा बनसोड या दोन जणी आहेत. मार्च 2021मध्ये गीताला तिचे कुटुंब सापडले होते. मार्च 2021 पासून गीता आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत गीता उर्फ ​​राधा हिने मंगळवारी कुटुंबासह मध्य प्रदेशातील भदभदा येथील रेल्वे पोलीस मुख्यालय येथे पोहोचून कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले. दरम्यान, गीता ही मूकबधिर आहे. त्यामुळे तिचा परिवार शोधायला अडचणी येत होत्या. मात्र, अखेर तिला तिचा परिवार मिळाला आहे. अशी पोहोचली होती पाकिस्तानात – गीता उर्फ राधाची आई मीना पंडारे यांनी सांगितले की, 1999 मध्ये वयाच्या आठव्या वर्षी राधा घराबाहेर पडली आणि तिने जवळचे स्टेशन गाठले आणि सचखंड एक्स्प्रेसमध्ये बसून अमृतसरला पोहोचली होती. तिथे स्टेशनवर भारत-पाकिस्तानदरम्यान धावणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये ती बसली आणि अशाप्रकारे चुकून पाकिस्तानात पोहोचली. गीता पोलिसांना पाकिस्तानमध्ये बेवारस अवस्थेत सापडली. यानंतर तिला एका संस्थेच्या ताब्यात देण्यात आले होते. यानंतर गीताला पाकिस्तानच्या ईधी फाउंडेशनने ठेवले आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांनी गीताला पहिल्यांदा 2015मध्ये भारतात आणण्यात आले. अशा प्रकारे परिवाराचा शोध – भारतात आल्यानंतर गीता इंदूरमधील आनंद या मूकबधिरांना मदत करणाऱ्या संस्थेत राहत होती. आनंद संस्थेचे संचालक ज्ञानेंद्र पुरोहित यांनी अनेक स्तरांवर तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गीतासोबत झालेल्या संवादादरम्यान त्यांना समजले की, तिच्या घराजवळ रेल्वे स्टेशन तसेच हॉस्पिटल आहे. यानंतर रेल्वेच्या मिसिंग चाइल्ड नेटवर्कच्या मदतीने, जिथे रेल्वे स्थानके आणि रुग्णालये जवळ आहेत अशा शहरांचा शोध घेण्यात आला, तपासादरम्यान, महाराष्ट्रातील परभणी हे शहर समोर आले. यासोबतच महाराष्ट्रातील पहल संस्थेचे अशोक कुलकर्णी यांनीही शोध सुरू केला. दरम्यान, परभणीतील वस्त्यांमध्ये अशा बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर एका कुटुंबाने त्यांच्या नातेवाईकाची मूकबधिर मुलगी राधा हरवल्याची तक्रार नोंदवल्याचे समोर आले. यानंतर गीताची आई मीना यांनी सांगितले की, राधा उर्फ ​​गीताच्या जन्मापासूनच तिच्या पोटावर खुणा आहे. ही ओळख पटल्यावर गीताला तिच्या आईशी भेटवण्यात आले. यानंतर डीएनए चाचणी केल्यानंतर गीता ही त्यांची मुलगी असल्याचे निश्चित झाले. हेही वाचा – प्लास्टिकच्या ‘या’ वस्तू असतील तर 2 दिवसात विल्हेवाट लावा, 1 जुलैपासून येतोय नवीन नियम

सांकेतिक भाषा शिक्षक बनायचे आहे –

दरम्यान, गीताच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तिच्या आईने दुसरे लग्न केले आहे. गीता म्हणाली की, माझी सर्वांनी खूप मदत केली. विशेषत: रेल्वे पोलिसांनी मला विशेष आधार दिला. मला माझा परिवार भेटला. मला भविष्यात सांकेतिक भाषा शिक्षक (Sign Language Teacher) बनायचे आहे आणि माझ्यासारख्या मुलांना मदत करायची इच्छा आहे, असेही ती यावेळी म्हणाली. दरम्यान, यावेळी रेल्वे पोलीसचे महासंचालक एमएस सिकरवार आणि रेल्वे पोलीस अधीक्षक हितेश चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित वर्मा यांच्यासह आनंद संस्थेचे ज्ञानेन्द्र पुरोहित, अशोक कुलकर्णी, आणि सांकेतिक भाषा शिक्षक अनिकेत आदी. उपस्थित होते.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.