Home » ताज्या बातम्या » पुणे: पावसाळी चेंबरमध्ये दोन जण पडले; पाणी जाण्यासाठी सुरक्षा न घेताच काढले झाकण

पुणे: पावसाळी चेंबरमध्ये दोन जण पडले; पाणी जाण्यासाठी सुरक्षा न घेताच काढले झाकण

पुणे:-पावसाळी-चेंबरमध्ये-दोन-जण-पडले;-पाणी-जाण्यासाठी-सुरक्षा-न-घेताच-काढले-झाकण

पुणे – शहरातील पावसाळी कामे आणि नालेसफाईची शुक्रवारी अक्षरश: पोलखोल झाली. 40 ते 45 मिनिटे ते देखील मध्यवस्ती आणि लगतच्या भागांत झालेल्या पावसाने मेहंदळे गॅरेज चौक रिलायन्स मॉल परिसरात पाणी तुंबले. ते वाहून जाण्यासाठी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर असलेल्या पावसाळी जलवाहिनीचे चेंबर बाजूला काढले होते.

यामध्ये दोन दुचाकीस्वार वाहनांसह पडले. चौकात सिग्नलला थांबलेल्या नागरिकांनी या दोन्ही वाहनाचालकांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेकडून केला जात असलेला हलगर्जीपणा यंदाच्या पावसाळयात पुणेकरांच्या जीवावर बेतण्याची चिन्हे आहेत.

या पावसामुळे चेंबरची झाकणे अनेक ठिकाणी वर आली, तर काही ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही झाकणे काढून ठेवली. अशाच प्रकारे मेहंदळे गॅरेज चौकात रिलायन्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावरील चेंबरचे झाकण मनपा कर्मचाऱ्यांनी बाजूला ठेवले होते. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्याचा निचरा करण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करतात.

मात्र, यंदा पुन्हा तेथे तळे साचले. या मुख्य चौकात पावसाळी चेंबरमधून पाणी उफळून येत होते. त्यामुळे, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चेंबरचे झाकन काढले. मात्र, त्याच्या बाजूसा सुरक्षेसाठी काहीच ठेवले नाही. या चेंबरचा अंदाज न आल्याने प्रसाद खांडके तसेच शालेय साहित्य विक्रेते हसमुख मेहता या चेंबरमध्ये गाडीसह पडले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना बाहेर ओढल्याने संभाव्य दुर्घटना टळली. या दुर्घटेनत खांडके यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. तर मेहता यांचे शालेय साहित्य भिजले आहे.

अक्षम्य निष्काळजीपणा
दत्तवाडी येणाऱ्या रस्त्यावर रिलायन्स मॉलसमोरच हे चेंबर आहे. काही दिवसापूर्वीच पालिकेने ते स्वच्छ केले होते. मात्र, त्यानंतरही त्यात कचरा होता. तसेच ते पूर्ण बुडाले असतानाही त्याचे झाकण कर्मचाऱ्यांनी काढून ठेवले होते. यावेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चेंबरबाजूला सुरक्षेसाठी बॅरिकेड लावणे अपेक्षित होते. मात्र, कर्मचारी तसे न करताच निघून गेले. ही वाहने चेंबरमध्ये पडल्यानंतर काही नागरिकांनी बाजूला पडलेल्या झाडाच्या फांद्या या चेंबरमध्ये टाकल्या त्यामुळे नागरिकांनी ते लक्षात आले. मात्र, पावसाचे प्रमाण आणखी असते, जीवितहानी होण्याची भीती होती.

“मी बिबवेवाडीकडून कोथरूडकडे जात होतो. रस्त्यावर पाणी साचलेले होते. त्यामुळे पाण्याखाली असलेले चेंबर दिसत नव्हते. मी दुचाकीसह चेंबरमध्ये वाहनाचे हॅंडल त्यात अडकले. त्यामुळे मीदेखील अडकलो. नागरिकांनी मला बाहेर काढल्यामुळे मी बचावलो.”
– प्रसाद खांडके, अपघातग्रस्त

Leave a Reply

Your email address will not be published.