..तर त्यांनी माफी मागावी; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर शिंदे गटही नाराज

मुंबई, 10 डिसेंबर : वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता शिंदे गटाकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
..तर माफी मागावी
सरकारला महापुरुषांबद्दल अभिमान असून, महापुरुषांबाबत कुणीही चुकीचं वक्तव्य करू नये. चुकीचं विधान केलं असेल तर ताबोडतोब माफी मागितली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांच्याशी मी याबाबत बोलणार आहे. ते निश्चितच याबाबत खुलासा करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर दिली आहे.
हेही वाचा : ‘आता मुक्यांची भाषा शिकावी लागेल, पण त्यातही…’, वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव
ठाकरे गटावर निशाणा
दरम्यान त्यांनी यावेळी पुन्हा एकदा ठाकरे गटावर देखील निशाणा साधला आहे. खोकेवाले कोण आहेत हे जनतेला माहीत आहे. आता खंडणीची धमकी कोणाला येणार नाही. खंडणी घेणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राला बदनाम केलं आहे. आतापर्यंत सीमाभागात राहणाऱ्या मराठी माणसांना सुविधा मिळत होत्या. मात्र त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद झाल्या. बाळासाहेबांच्या विचारापासून ते दूर गेले, असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.