तरुणांना दारू पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘या’ देशाने आयोजित केली स्पर्धा

तरुणांना-दारू-पिण्यास-प्रोत्साहित-करण्यासाठी-‘या’-देशाने-आयोजित-केली-स्पर्धा

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: दारू (Alcohol) आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि याच कारणामुळे अनेक देशांमध्ये दारूबंदी असते. भारतात गुजरात (Gujrat), बिहार (Bihar) यासारख्या अनेक राज्यांमध्ये कडक दारूबंदी लागू आहे. या ठिकाणी दारू मिळत नाही. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन लोकांचं आयुष्य बरबाद होऊ नये, हा दारूबंदीमागचा हेतू असतो. पण जगात असा एक देश आहे जो आपल्या नागरिकांना दारू पिण्यास प्रोत्साहित करतोय. या देशाने तरुणांना दारू पिण्यास प्रोत्साहित करणारी देशव्यापी स्पर्धा सुरू केली आहे. आपण जपानबद्दल बोलत आहोत. या संदर्भात लाईव्ह हिंदुस्थानने वृत्त दिलंय.

जपानमध्ये तरुणांचं नशा करण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे दारूची विक्री अपेक्षित प्रमाणात होत नाही. त्याचा परिणाम जपानच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. जपानची तरुण पिढी त्यांच्या पालकांपेक्षा कमी दारू पिते. परिणामी तांदूळापासून बनवलेल्या जपानी वाईनसारख्या पेयांवरचे करही कमी झाले आहेत. तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेमुळे थोडा तरी बदल घडेल, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा –  पार्टीत पंतप्रधानांचाच दारू पिऊन धिंगाणा; Video Leaked झाल्याने खळबळ

जपानच्या नॅशनल टॅक्स एजन्सीने (NTA) मोठा निर्णय घेतलाय. जपान ‘साके वायवा’ (Sake Viva) नावाची एक राष्ट्रीय स्पर्धा सुरू करत आहे. या स्पर्धेचा उद्देश तरुणांना दारू पिण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे. तसंच यामुळे वाईन उद्योगाला चालना मिळेल. 20 ते 39 वयोगटातील तरुणांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

जपानी वाईन स्पर्धा काय आहे?

तरुणांनी अशा बिझनेस आयडिया घेऊन यावं, ज्याच्या माध्यमातून त्यांच्या मित्रांमध्ये दारूची मागणी वाढेल, असं आवाहन जपान सरकारनं केलंय. दारू जपानी साके हो, शुकू (shochu), व्हिस्की, बिअर किंवा वाईन यापैकी काहीही चालेल. द गार्डियनच्या वृत्तानुसार ही स्पर्धा 9 सप्टेंबरपर्यंत खुली आहे. देशी दारूला प्रोत्साहन देण्यासाठी रणनीती तयार करण्याबरोबरच ‘नवीन वस्तू आणि डिझाइन’ तयार करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जपानी टॅक्स एजन्सीने एका कंपनीला कंत्राट दिलंय.

जपानी लोक दारू कमी का पितात?

ही स्पर्धा आयोजित करणार्‍या कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना महामारीच्या काळात देशात कमी दारू पिण्याचा ट्रेंड सुरू झाला. जपानची वृद्ध लोकसंख्या हे देखील यामागचं एक कारण आहे, ज्यामुळे दारूच्या विक्रीत घट झाली आहे. जपानमधील घटता जन्मदर हे त्याचे महत्वाचं कारण आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, जपानच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश (29%) लोकसंख्या 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची आहे. ही आकडेवारी जपानला जगातील सर्वांत जास्त वयोवृद्ध लोकसंख्या असलेला देश बनवते.

हेही वाचा –  Shocking! तुरुंगात असलेल्या प्रियकराला भेटायला गेली तरुणी; KISS करताच कैद्याचा मृत्यू

तरुणांनी अशा बिझनेस आयडिया आणाव्यात, जेणेकरून देशात पुन्हा दारूचे सेवन वाढू शकेल, अशी कंपनीची इच्छा आहे. या स्पर्धेतील सहभागी होणारे प्रमोशन, ब्रँडिंग आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंबंधित अत्याधुनिक योजनांसह येऊ शकतात. जपानी मीडियानुसार, सरकारच्या या निर्णयावर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दारूतून मिळणाऱ्या महसुलात घट

स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये अंतिम प्रस्ताव सादर करण्यापूर्वी तज्ज्ञांच्या मदतीने सर्वोत्कृष्ट बिझनेस प्लॅन्सची निवड केली जाईल. जपानचे वाईन मार्केट कमी होत आहे. टॅक्स एजन्सीच्या अलीकडील आकडेवारीनुसार, लोक 1995 च्या तुलनेत 2020 मध्ये कमी दारू पित होते. हा आकडा 1995 मधील 100 लिटर (22 गॅलन) वरून 75 लिटर (16 गॅलन) वर घसरला आहे. गेल्या काही वर्षात दारूमधून मिळणारा कर महसूलही कमी झाला आहे. द जपान टाईम्स वृत्तपत्रानुसार, 1980 मध्ये जपानच्या एकूण कमाईमध्ये अल्कोहोलचा वाटा 5% होता, परंतु 2020 मध्ये तो फक्त 1.7% आहे. त्यामुळे दारू पिण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने ही नवी कल्पना आणली आहे. यामध्ये सरकारला किती यश येतं हे येत्या काळात कळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *