जेलबाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, या दोघांना धरलं जबाबदार

जेलबाहेर-येताच-अनिल-देशमुखांची-पहिली-प्रतिक्रिया,-या-दोघांना-धरलं-जबाबदार

मुंबई, 28 डिसेंबर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काहीच वेळापूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते आणि कार्यकर्ते जेलबाहेर जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलं.

जेलबाहेर येताच अनिल देशमुख यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली, तसंच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यावर आरोप केले.

काय म्हणाले अनिल देशमुख?

‘मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं आहे. परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंग यांनी मी केलेले आरोप ऐकिव माहितीवर आहेत, माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही, असं अॅफिडेविट दिलं. परमवीर सिंग यांच्या अत्यंत जवळचा सचिन वाझे याने माझ्यावर आरोप केले, पण सचिन वाझे यांच्यावरच गंभीर आरोप आहेत. या सचिन वाझे याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे,’ असं अनिल देशमुख म्हणाले.

‘माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं निरीक्षण सुद्धा न्यायालयाने केलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला, याबाबत मी सगळ्यांचे आभार मानतो. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो,’ अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

अनिल देशमुखांवर कोणते आरोप?

अनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *