जुळ्या बहिणींशी लग्न करुनही 'अतुल' कायद्याच्या कचाट्यातून सुटला : काय म्हणालं न्यायालय?

जुळ्या-बहिणींशी-लग्न-करुनही-'अतुल'-कायद्याच्या-कचाट्यातून-सुटला-:-काय-म्हणालं-न्यायालय?

अकलूज : जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव अतुल आवताडे याच्यावर कारवाई करण्यास सोलापूर न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. अतुल आवताडेवर नोंदवलेल्या अदखलपात्र खटल्याची चौकशी करण्याची अकलूज पोलिसांची याचिका आज (शुक्रवारी) सोलापूर जिल्हा न्यायदंंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

‘मिड-डे’ वृत्तपत्रासोबत बोलताना, सोलापूरचे पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे म्हणाले, नुकतंच जुळ्या बहिणींशी लग्न केलेल्या व्यक्तीविरुद्ध नोंदवलेल्या एनसीमध्ये तपासाचे अधिकार मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सीआरपीसीच्या कलम 198 चा हवाला देऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी अदखलपात्र खटल्याची चौकशी करण्याची परवानगी नाकारली आहे.

खटल्यातील तक्रारदार हा पिडीत पक्ष म्हणजेच संबंधित कुटुंबातील सदस्य असावा. या खटल्यात तक्रारदार पीडित पक्ष नसल्याने या याचिकेची दखल घेऊ शकत नसल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं. यामुळे या प्रकरणात संबंधित नवरदेवावर कोणतीही कारवाई होणार नसल्याच आता स्पष्ट झालं आहे.

काय आहे प्रकरण?

अतुल उत्तम आवताडे (रा. महाळुंग, गट नं-२) या तरुणाने ३ डिसेंबरला एकाच वेळी दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलं. मुंबईतील कांदिवली येथील रिंकी आणि पिंकी या दोघींशी अतुलने लग्नगाठ बांधली. कायद्यानुसार हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न ग्राह्य मानलं जातं नाही, ते रद्दबातलं किंवा अवैध ठरवलं जातं.

तसंच संबंधित व्यक्तीवर गुन्हाही दाखल होतो. या प्रकरणात माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार देखील नोंदविली होती. त्यानुसार ‘अतुल उत्तम आवताडे’ विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला होता.

मग अतुलवर कारवाई का नाही? कायद्यातील पळवाटा काय आहेत?

कायदयाचे अभ्यासक ॲड. विनायक सरवळे यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं,

  • 494 कलमांतर्गत फक्त पती आणी पत्नीलाचं तक्रार करण्याचा अधिकार आहे. लग्न पूर्णपणे दोन व्यक्तीपुरता मर्यादित विषय असल्याने त्रयस्त व्यक्तीला यामध्ये तक्रार करण्याचा अधिकार कायद्याने दिला नाही.

  • त्यामुळेच राहुल भारत फुले यांनी नोंदविलेली तक्रार कायदेशीर दृष्ट्या वैध ठरतं नाही.

  • या प्रकरणात कोणत्याही पत्नीची तक्रार नाही, आणि तिसऱ्या व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार नसल्यामुळे कोणाच्या तक्रारीवरुन कारवाई करायची हा पेच आहे.

  • संबंधित व्हिडीओ क्लिपमध्ये दोन्ही बहिणींनी नवरदेवाला एकत्र हार घातला आहे. त्यामुळे त्यामुळे पहिली पत्नी कोणती आणि दुसरी कोणती हा एक विषय प्रलंबित राहतो.

  • त्यामुळे नेमका कोणता विवाह अवैध ठरवायचा याबाबतही पेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *