छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य! , संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

छत्रपती-संभाजीराजे-स्वराज्य-रक्षक-की-धर्मवीर?-अण्णाजी-पंतांचे-तारतम्य!-,-संजय-राऊतांचा-जोरदार-हल्लाबोल

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे. पाहा नेमकं काय म्हणण्यात आलं आहे….

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विधिमंडळ अधिवेशनादरम्यान एक विधान केलं. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) यावरच भाष्य करण्यात आलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले.

एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. ”छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला.

संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले, असं सामनातून म्हणण्यात आलं आहे.

संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. हा शौर्याचा व धर्मरक्षणाचा वारसा संभाजीराजांनी आपल्या राजश्री आबासाहेबांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला.

दि. 6 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळ भट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. संभाजीराजे म्हणतात, ”राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हांस अगत्य.” याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *