चित्रा वाघ-उर्फी जावेद प्रकरणात सुषमा अंधारेंची उडी;पोस्टमधून साधला निशाणा

चित्रा-वाघ-उर्फी-जावेद-प्रकरणात-सुषमा-अंधारेंची-उडी;पोस्टमधून-साधला-निशाणा

मुंबई,3  जानेवारी- ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद सतत आपल्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेदवर सर्वच स्थरातून सोशल मीडियावर टीका होत असते. मात्र उर्फी कोणालाही न जुमानता विविध प्रकारचे ग्लॅमरस ड्रेस परिधान करत असते. यावेळी उर्फी जावेद मात्र चांगलीच अडचणीत सापडली आहे. यावेळी उर्फीवर राजकीय क्षेत्रातील लोकांनी टीकास्त्र सोडलं आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीच्या कपड्यांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत कडाडून विरोध केला होता. त्यांनंतर उर्फीने पलटवार करत चित्रा वाघ यांना सुनावलं होतं. या दोघींचं सोशल मीडिया युद्ध सध्या चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आता या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेत प्रकरणाला नवं वळण दिलं आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्वीटमध्ये, अमृता फडणवीस, कंगना रनौत आणि केतकी चितळे यांचे काही फोटो शेअर करत लिहलंय, ‘मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…

(हे वाचा:Urfi Javed : उर्फीवर कायदेशीर कारवाई होणार? चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत केली ही मागणी )

अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला नवं वळण दिलं आहे.

सुषमा अंधारे यांच्या या फेसबुक पोस्टनंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. या पोस्टवर आता विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. सुषमा अंधारे नेहमीच आपल्या पोस्टमधून आणि भाषणातून रोखठोक मत मांडत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकवेळा खळबळ माजवत असतात. या पोस्टवर लोक संमिश्र भूमिका मांडताना दिसत आहेत.

तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर उर्फी विरोधात मुंबईतील महिला सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. उर्फीच्या या अंगप्रदर्शनामुळे समाजातील तरुण पिढीवर चुकीचा प्रभाव पडत असल्याचं त्यांचं मत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी उर्फीच्या अशा कपड्यांवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *