चिंचवड जागेवरुन आघाडीत मतभेद? अजित पवारांनंतर आता शिवसेनेचा दावा; राऊत म्हणाले..

चिंचवड-जागेवरुन-आघाडीत-मतभेद?-अजित-पवारांनंतर-आता-शिवसेनेचा-दावा;-राऊत-म्हणाले.

पुणे, 25 जानेवारी : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्यानं चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे भाजपबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील चिंचवडच्या जागेवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चिंचवड विधानसभा आम्ही लढवणार : संजय राऊत

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले, की पुण्यात दोन पोट निवडणूक होत आहेत. महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांचं निधन झालं आहे. शिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची जागा आम्ही लढावी आणि चिंचवडच्या मतदारांचा देखील तो हक्क आहे की ही निवडणूक आम्ही लढावी. काल (मंगळवारी 24 जानेवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, एकनाथ खडसे हे मातोश्रीवर आले होते. त्यावेळेस सुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली. पण चिंचवडची निवडणूक शिवसेनेकडे असावी आणि मागच्या निवडणुकीत सुद्धा राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी निवडणूक लढले होते, फार चांगली झुंज दिली होती. यावेळी ही जागा आम्ही जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी आहे. अनेकदा आम्ही सुद्धा दावे करतो. अजित पवार यांचे देखील काही म्हणणं होतं ते आम्ही ऐकून घेतलं. चिंचवडची जागा शिवसेनेला असावी असं आमचं मत आहे.

वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाची रणनिती ठरली; चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन

चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार?

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे अनुक्रमे चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपनं लढवलेल्या कोल्हापूर, पंढरपूर आणि देगलूर पोटनिवडणुकीचा उल्लेख करत बिनविरोधाची शक्यता फेटाळली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष कैलास कदम यांनीही काँग्रेस निवडणुकीत उतरणार असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळलं आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची काही नावं पुढं येत आहेत. दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. भाजप त्याबाबत निर्णय घेईल. आम्ही त्यात नाक खुपसने गरजेचं नाही. मात्र, दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी, अशी ईच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *