चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीस जिल्हाधिकारी यांची मान्यता.आमदार मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश…

जळगाव

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन

दि.१८ – चाळीसगाव शहरासह तालुक्यातील लाखो शिवप्रेमींच्या नजरा ज्याकडे लागून आहेत त्या चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात (सिग्नल पॉईंट) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. *जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारणीस मान्यता देण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

*गेल्या अनेक महिन्यांपासून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी नगरपालिका मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर जिल्हाधिकारी यांचा आदेश प्राप्त झाल्याने शिवपुतळा उभारणी मधील शेवटची कायदेशीर अडचण दूर झाली आहे.
चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा सिग्नल पॉईंट येथे उभारणीसाठी जागेलगत असणारा *राष्ट्रीय महामार्ग अवर्गीकृत करणे, सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा नगरपालिका कडे हस्तांतरण करणे आदी अडचणी होत्या. तत्कालीन *भाजपा शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री गिरिषभाऊ महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी सदर अडचणींवर मात करत राष्ट्रीय महामार्ग अवर्गीकृत केला होता व सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा नगरपालिका कडे हस्तांतरित केली होती.
मात्र नंतरच्या काळात महापुरुषांची स्मारके उभारणी व त्या स्मारकांचे पावित्र्य राखले जावे यासाठी *शासनाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर असल्याने त्या मार्गदर्शक तत्वांमुळे अनेक निर्बंध आल्याने पुतळा उभारणीस कायदेशीर अडचणी येत होती.
त्याबाबतच्या शासन निर्णयानुसार पुतळ्याच्या परवानगी साठी *जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती गठीत करून ती समिती सर्व कागदपत्रे व अहवाल तपासणी करून पुतळा उभारणीस मान्यता देते.
*आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत सदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मान्यतेसाठी समिती गठीत करून लवकरात लवकर त्याची बैठक व्हावी यासाठी प्रयत्न केले.
सदर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या पुढे पुतळा मान्यतेसाठी कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी *आमदार मंगेश चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य कलासंचालनालय कडून सदर पुतळा कलात्मक दृष्टीने योग्य असल्याचे प्रमाणित करून घेतले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य वास्तू शास्त्रज्ञ यांच्याकडून सदर पुतळ्याकरिता उभारण्यात येणाऱ्या चबूतऱ्याच्या आराखड्यास मान्यता मिळवून घेत तसे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरपालिका मार्फत सादर केले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी सदर पुतळा समितीची बैठक घेऊन सर्व कागदपत्रे यांची पडताळणी करत *आज दि.१८ फेब्रुवारी २०२० रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पुतळ्याला मान्यतेचा आदेश पारित केल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिवप्रेमींमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. लवकरच लाखो शिवप्रेमींच्या साक्षीने शिवप्रभूंचे अश्वारूढ व प्रेरणादायी असे स्मारक चाळीसगाव येथील सिग्नल पॉईंट येथे उभारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *