चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेशी सरकार असहमत? राज्यातील शाळांना ११०० कोटींचं अनुदान मंजूर

चंद्रकांत-पाटील-यांच्या-भूमिकेशी-सरकार-असहमत?-राज्यातील-शाळांना-११००-कोटींचं-अनुदान-मंजूर

मुंबई : सरकारवर आणि सरकारच्या अनुदानावर कशाला अवलंबून राहता? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करताना सरकारनं या सगळ्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली, असं वक्तव्य केल्यानं मंत्री चंद्रकांत पाटील राज्यभरात वादात सापडले होते. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

त्यानंतर या वक्तव्याबाबत खुलासा करत चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरीही व्यक्त केली. मात्र त्यानंतर देखील विरोध शांत झाला नाही. अशातच निषेध म्हणून त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या या भूमिकेशी महाराष्ट्र सरकारच असहमत आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याच बैठकीमध्ये राज्यातील शाळांनाअनुदान मंजूर करण्यात आलं आहे. त्यासाठी तब्बल ११०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडून अद्याप चार दिवसही झालेले नसताना सरकारने अनुदानाचा निर्णय घेतल्याने सरकारचं चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेशी असहमत आहे का? हा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

#मंत्रिमंडळनिर्णय
👉महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी निर्गुन्हेगारीकरण करणार

👉राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता

👉महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 13, 2022

काय म्हणाले होते चंद्राकांत पाटील?

पैठणमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचं असेल तर सरकार नक्की मदत करतील. मी आणि संदीपान भुमरे अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर पैशांची कमतरता येणार नाही.

पण माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मला शाळा चालवतोय, पैसे द्या. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

पुढे ते म्हणाले, आता त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, हेही त्यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *